पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने


पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी महापालिका निवडणुकीत महायुती व्हावी, अशी अपेक्षा असल्याचे मागील आठवड्यात चिंचवडमध्ये सांगितल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टोक्तीनंतर पिंपरीत भाजप-अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच लढत होणार असल्याचे निश्चित असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच आमने-सामने येण्याची शक्यता आहे.


एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहराची अजित पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख होती; परंतु त्यांच्या बालेकिल्ल्याला भाजपने २०१७ मध्ये सुरुंग लावला. १५ वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता भाजपने उलथवून टाकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकडे विशेष लक्ष दिले. मुख्यमंत्र्यांनी माजी आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना राजकीय पाठबळ दिले. चारवरुन ७७ नगरसेवक निवडून आणले. महापालिकेवर पहिल्यांदाच कमळ फुललल्यानंतर फडणवीस यांनी शहरात संघटना बळकट करण्यावर भर दिला. जुन्या पदाधिकाऱ्यांना ताकद दिली. अमर साबळे यांना राज्यसभेची खासदारकी, सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, अमित गोरखे यांना महामंडळ, उमा खापरे यांच्याकडे महिला संघटनेचे राज्याचे नेतृत्व दिल्यानंतर विधानपरिषदेतही संधी दिली. गोरखे यांना विधानपरिषदेवर घेतले. शहरातीलच अनुप मोरे यांच्याकडे युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्षपद दिले. त्यामुळे भाजपच्या प्रदेश नेतृत्वाचे शहरावर विशेष लक्ष असल्याचे दिसते. चार आमदार असलेला भाजप शहरात सर्वात मोठा पक्ष झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे एक आमदार आणि शिवसेनेचे (शिंदे) श्रीरंग बारणे एकमेव खासदार आहेत.


पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपखालोखाल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. शहर भाजपने सुरुवातीपासून स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली. शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. महायुतीमध्ये सहभागी असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची युती व्हावी अशी अपेक्षा होती. तशी भूमिका त्यांनी मागील आठवड्यात चिंचवडमध्ये व्यक्त केली होती. त्यांच्या पक्षाच्या अनेक माजी नगरसेवकांचीही युती व्हावी अशी अपेक्षा होती. परंतु, आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षाची मदार अजित पवार यांच्यावरच असणार आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष असलेले पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे स्थानिक भाजप आमदारांवर टीका करत नाहीत. परिणामी, शहरातील प्रचाराची धुरा अजित पवारांकडेच राहील. पिंपरीचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बालेकिल्यावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागेल. त्यातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय

लातूरकरांचा प्रवास सुसाट! राज्य सरकारची मुंबई-लातूर महामार्गाला संमती, संरेखनेचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई ते लातूर

आचारसंहितेमुळे रखडलेली सोडत लवकरच होणार; पुणे मंडळाच्या सभापतींनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

पुणे: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर,

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची