‘यूजीसी’ने जाहीर केली यादी
मुंबई : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. या विद्यापीठांकडून विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करण्यात येते. विद्यार्थी व पालकांची होणारी लूट थांबण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील मान्यता नसलेल्या विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये २२ विद्यापीठांचा समावेश असून, यूजीसीने या विद्यापीठांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
देशातील प्रत्येक विद्यापीठाला यूजीसीची मान्यता घेणे बंधनकारक आहे. यूजीसी कायदा १९५६ अंतर्गत कलम २२(१) नुसार केंद्र, राज्य व प्रांतातील शैक्षणिक संस्थांना विद्यापीठाची मान्यता देण्यात आली आहे. तर कलम ३ नुसार अभिमत विद्यापीठांना मान्यता देण्यात आली आहे. मान्यता नसल्यास यूजीसी कायद्याच्या कलम २३ अंतर्गत ‘विद्यापीठ’ संबोधणे गुन्हा आहे. त्यामुळे मान्यता नसलेल्या विद्यापीठांची माहिती व्हावी यासाठी यूजीसीकडून दरवर्षी ऑक्टोबरमध्ये देशातील अशा विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात येते.