नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी तेजस्वी यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे करत, बिहारमध्ये केवळ पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे 'डबल इंजिन' सरकारच विकास करु शकते, असे ठामपणे सांगितले.
प्रसाद म्हणाले, "तेजस्वी यादव काय बोलत आहेत, त्यांना तरी कळतेय का? त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील चार प्रकरणांमध्ये साडेबत्तीस वर्षांची (३२.५) शिक्षा झाली आहे आणि तेजस्वी यादव स्वतः भादंवि कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत आरोपी आहेत. बिहारचा विकास कोणी केला आहे, हे येथील जनतेला चांगलेच माहीत आहे."
काँग्रेसकडून तेजस्वी यादव यांची उमेदवारी जाहीर
दरम्यान, यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव हेच बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महागठबंधनचे अधिकृत मुख्यमंत्री उमेदवार असतील, असे घोषित केले. गेहलोत म्हणाले, "देशातील परिस्थितीबद्दल सगळ्यांनीच चिंतेत असायला हवे. राहुलजी आणि खर्गेजी यांच्याशी चर्चा करून मी सांगू शकतो की, तेजस्वी यादव हे या निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. ते तरुण आहेत आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, जनता त्यांना पाठिंबा देईल."
यावेळी बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना गेहलोत यांनी बिहारच्या जनतेला बदल हवा असल्याचे सांगितले. केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकारची कार्यपद्धती लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी टीका करताना म्हटले.
बिहारमध्ये ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार असून, १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि महागठबंधन यांच्यात थेट लढत होणार आहे.