तुमची संपत्ती मला द्या, माजी खासदार नवनीत राणा यांचे खुले आव्हान
अमरावती : माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांना खुले आव्हान दिले आहे. अनेक लोक आजीचे माजी झालेत. कारण, त्यांनी कधीच आपल्या खिशात हात टाकला नाही. त्यांच्याकडे फक्त ‘इनकमिंग’, ‘आऊटगोइंग’ नाही. मी त्यांना दहा वेळा म्हणाले की, तुमची संपत्ती मला द्या, माझी संपत्ती तुम्ही घ्या. ‘नौटंकी’मुळेच त्यांना एका शेतकऱ्याच्या मुलाने पराभूत केले, अशी खरमरीत टीका नवनीत राणा यांनी केली.
नवनीत राणा यांनी काल आपल्या निवासस्थानी अंध, अपंग आणि कुष्ठरोगी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून राणा दामपंत्याच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याच वेळी प्रसार माध्यमांशी बोलताना राणा यांनी राजकीय विरोधकांवर जोरदार टीका केली.
तेव्हा शेतकऱ्यांचा कळवळा का आला नाही..
नवनीत राणा म्हणाल्या, सध्या बरेच लोक ‘नौटंकी’ करत आहेत. बाहेर फिरून आमदारांना मारून टाका असे सांगत आहेत. पण तुम्ही चार वेळा आमदार होतात. दोन वेळा मंत्री राहिलात. तेव्हा शेतकऱ्यांचा कळवळा का आला नाही, अशा शब्दांत त्यांनी कडू यांच्यावर टीका केली.
अचलपूरच्या माजी आमदारांकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचा थेट आरोप नवनीत राणा यांनी केला. आमदारांना कथितपणे मारून टाकण्याची भाषा केल्याबद्दलही राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीकास्त्र सोडले. बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यात एका सभेत बोलताना शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापून टाका, असे वादग्रस्त वक्तव्य कडू यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
नवनीत राणा या बच्चू कडू यांच्यावर सातत्याने टीका करतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. नवनीत राणा या पराभूत झाल्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे नवनीत राणा यांच्या टीकेची धार वाढली.
ते कुटुंबासाठी नाही, तर फक्त सत्ता व खुर्चीसाठी एकत्र
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, कुटुंब एकत्र येणे ही आपली संस्कृती आहे. आपण ती जपली पाहिजे. आज संपूर्ण महाराष्ट्र दोन भाऊ एकत्र आल्याचे पाहत आहे. पण ते कुटुंबासाठी नाही, तर फक्त सत्ता व खुर्चीसाठी एकत्र आले आहेत. फक्त पैसा आणि तोड्या करण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत. ठाकरे परिवार हे ‘मजबुरी’चे दुसरे नाव झाले आहे.
बच्चू कडू हे नेहमीप्रमाणे सरकारवर दबाव टाकण्यासाठी ब्लॅकमेल करतात
अमरावतीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, आमदार रवी राणा यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपलं राजकीय पुनर्वसन करा, मला विधान परिषदेवर पाठवा, अशी मागणी केली. रवी राणा यांनी आरोप केला की, बच्चू कडू हे नेहमीप्रमाणे सरकारवर दबाव टाकण्यासाठी ब्लॅकमेल करत आहेत. त्यांनी विचारलं की, जेव्हा बच्चू कडू चार वेळा आमदार होते, तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांसाठी अशी कोणती भूमिका घेतली? गुवाहाटीला जाताना त्यांनी शेतकऱ्यांचा सल्ला का घेतला नाही?राणा यांनी पुढे म्हटलं की, सत्तेत असताना बच्चू कडू यांनी कधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कठोर भूमिका घेतली नाही, आणि आता सत्तेपासून दूर गेल्यावर ते अशा मागण्या करत आहेत.
विशेष म्हणजे, एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने बच्चू कडू यांचा पराभव केला, हे देखील रवी राणा यांनी अधोरेखित केलं.राजकीय वर्तुळात या आरोपांमुळे खळबळ उडाली असून, यावर बच्चू कडू काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.