Bill Gates: हिंदी मनोरंजन विश्वातून एक भन्नाट बातमी समोर आली आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात प्रभावशाली उद्योगपतींपैकी एक असलेले बिल गेट्स आता भारतीय टेलिव्हिजनवर झळकणार आहेत. होय, ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे अगदी खरं आहे! भाजपच्या माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध अभिनेत्री स्मृती इराणी यांच्या आगामी मालिकेत ‘क्योंकी सास भी कभी बहू थी २’ बिल गेट्स खास कॅमिओ करताना दिसणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिल गेट्स केवळ एका क्षणापुरते नाही, तर मालिकेच्या तीन एपिसोड्समध्ये झळकतील. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, एका भावनिक वळणावर स्मृती इराणी आणि बिल गेट्स हे व्हिडिओ कॉल वर संवाद साधताना दिसतील. हा प्रसंग केवळ मनोरंजनासाठी नसून त्यामागे एक गंभीर सामाजिक संदेश दडलेला असेल.
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ (Bill & Melinda Gates Foundation) अनेक वर्षांपासून नवजात शिशूंचा मृत्यूदर (Neonatal Mortality Rate) कमी करण्यासाठी आणि बालकांच्या आरोग्यासाठी (Child Health) काम करत आहे. हाच मुद्दा मालिकेत गुंफण्यात आला असून, त्याद्वारे समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मालिकेशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, “आम्ही गर्भवती महिला आणि नवजात बाळांच्या आरोग्यावर आधारित एक खास ट्रॅक तयार केला आहे. या कथानकाद्वारे लोकांना आरोग्य आणि बालसंगोपनाबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न होईल. बिल गेट्स यांच्या फाउंडेशनचं या दिशेने चाललेलं खरं काम लक्षात घेऊन आम्ही त्यांच्याशी जोडले गेलो.”
स्मृती इराणी स्वतः या मालिकेतून समाजात बदल घडवण्याच्या उद्देशाने काम करत आहेत. त्यांना वाटतं की टेलिव्हिजन हा फक्त मनोरंजनाचं माध्यम नसून, सामाजिक जाण वाढवण्याचंही एक व्यासपीठ आहे.
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ने नेहमीच महिलांच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्या दाखवल्या, मात्र आता त्याचा हा नवा सीझन समाजातील महत्त्वाच्या विषयांना गांभीर्याने हाताळणार आहे. बिल गेट्स यांची एन्ट्री या मालिकेला एक वेगळं आणि प्रेरणादायी वळण देईल, हे निश्चित.