तिकीट खिडकीवरील गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेचा ‘एसटी पॅटर्न’
मुंबई : दिवाळी आणि छट पूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून अनेक प्रवाशांना लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी आरक्षण न मिळाल्याने अनेक प्रवासी अनारक्षित तिकिटावर प्रवास करतात. त्यामुळे स्थानकांवरील तिकीट काउंटरवर मोठ्या रांगा लागत असतात. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने यंदा नवा प्रयोग हाती घेतला आहे. बस कंडक्टरप्रमाणेच रेल्वे बुकिंग कार्यालयातील कर्मचारी आता प्रवाशांच्या जवळ जाऊन तिकीट देणार आहेत.
या उपक्रमाअंतर्गत बुकिंग कर्मचारी वेटिंग एरिया किंवा प्रवासी थांबण्याच्या ठिकाणी जाऊन हँडहेल्ड मशीनच्या माध्यमातून तिकीट देतील. या मशीनमध्ये रोख रक्कम तसेच ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारच्या पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. सध्या ही सुविधा मुंबई सेंट्रल विभागातील मुंबई सेंट्रल, वाद्रे टर्मिनस आणि बोरिवली या स्थानकांवर सुरू करण्यात आली असून, लवकरच सुरत आणि उधना स्थानकांवरही सुरू होणार आहे. वांद्रे टर्मिनस येथे या कामासाठी नऊ बुकिंग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
वांद्रे टर्मिनसवरून सर्वाधिक अनारक्षित गाड्या
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात दिवाळी आणि छठ पर्वाच्या काळात सर्वाधिक अनारक्षित गाड्या वांद्रे टर्मिनस स्थानकावरून सुटतात. त्यामुळे तेथील गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यात आली आहे. नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच या काळात ३० आरपीएफ, ३५ जीआरपी आणि १५ होमगार्ड तैनात करण्यात
आले आहेत.
गाडी सुटण्यापूर्वी सर्व बुकिंग कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी तपासूनच आत सोडले जातात, जेणेकरून गर्दी आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गाड्या सुटण्यापूर्वी सर्व बुकिंग कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी तपासूनच आत सोडले जातात, जेणेकरून गर्दी आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, असे
अधिकाऱ्यांनी सांगितले.