दीपक कैतके यांची सरकारकडे तत्काळ कारवाईची मागणी
मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवासात दिव्यांग प्रवाशांवर होणाऱ्या भेदभावाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. मेट्रोच्या लाइन २ए आणि लाइन ७ वर दिव्यांग प्रवाशांना प्रवासात सवलत दिली जाते, मात्र अत्यंत जवळच्या लाइन ३ (अक्वा लाईन) वर हीच सवलत अद्याप लागू झालेली नाही. या असमान धोरणामुळे दिव्यांग प्रवाशांना दररोज आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य व दिव्यांग प्रतिनिधी दिपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून तातडीने या भेदभावावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. “एका मार्गावर सवलत मिळते आणि दुसऱ्यावर नाही, हा स्पष्ट भेदभाव आहे. हा दिव्यांगांच्या अधिकारांवरील थेट आघात आहे,” असे कैतके यांनी स्पष्ट केले. या भेदभावामागे मेट्रो ऑपरेटरांचे वेगळे धोरण, स्मार्ट कार्ड प्रणालीतील तांत्रिक अडचणी आणि शासनातील समन्वयाचा अभाव हे प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. सामाजिक संघटना व हक्क रक्षण करणाऱ्या संस्थांनीही या प्रकरणावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यांचा ठाम आग्रह आहे की दिव्यांग प्रवाशांना प्रवासात सवलत देणे ही ‘सुविधा नसून कायद्याने दिलेला हक्क’ आहे.