मुंबई : सध्या निरोगी जीवनशैलीकडे झुकणाऱ्या अनेक लोकांचा कल हेल्दी डाएट, योगा, व्यायाम, आणि विविध सप्लिमेंट्सकडे वाढताना दिसतो आहे. त्यात ‘फिश ऑइल सप्लिमेंट्स’ हे एक मोठं नाव बनलं आहे. शरीरातील ओमेगा-३ फॅटी अॅसिडच्या गरजेसाठी हे सप्लिमेंट खूपच लोकप्रिय झालं आहे. मात्र, अलीकडील संशोधनानुसार, हे सप्लिमेंट सर्वांसाठी सुरक्षित आहेच असं नाही.
फिश ऑइल – फायदेशीर की हानिकारक?
फिश ऑइलमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड हृदयासाठी फायदेशीर मानले जातात. रक्तदाब कमी करणे, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणे, आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करणे, असे याचे फायदे सांगितले जातात. मात्र, अलीकडील अभ्यासांतून हे स्पष्ट होत आहे की कोणताही पूर्वीचा हृदयविकार नसलेल्या लोकांसाठी या सप्लिमेंट्सचा वापर उलट त्रासदायक ठरू शकतो.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, फिश ऑइल सप्लिमेंट्स घेणाऱ्या अशा व्यक्तींमध्ये — ज्यांना हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता — ॲट्रियल फायब्रिलेशनचा धोका सुमारे १३% वाढला आणि स्ट्रोकचा धोका ५% ने वाढलेला आढळला. विशेषतः महिलांमध्ये हा त्रास जास्त दिसून येतो.
दुसऱ्या बाजूला, हेच सप्लिमेंट्स हृदयविकाराच्या रुग्णांसाठी काही प्रमाणात फायदेशीर ठरते. तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं की अशा रुग्णांमध्ये ॲट्रियल फायब्रिलेशनचा झटका गंभीर स्वरूप धारण करण्याचा धोका १५% ने कमी झाला. तसेच हृदयविकारामुळे मृत्यू होण्याची शक्यता सुमारे ९% ने घटली.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंट घेणे टाळा
कोणतीही अन्नपूरक गोळी, ती नैसर्गिक असली तरीही, प्रत्येकासाठी योग्यच असेल असे नाही. शरीरात ओमेगा-3 ची कमतरता असेल आणि आहारातून ती भरून न निघाल्यास वैद्यकीय सल्ल्यानेच फिश ऑइल सप्लिमेंट्सचा वापर करावा.
संपूर्णपणे निरोगी व्यक्तींनी फक्त "प्रिव्हेंटिव्ह" उपाय म्हणून फिश ऑइल सप्लिमेंट्स घेणे टाळावे. त्याऐवजी, ओमेगा-3 मिळवण्यासाठी नैसर्गिक स्रोत जसे की अक्रोड, जवसाचे बी, किंवा मासे यांचा यांचा आहारात समावेश करणे अधिक सुरक्षित ठरू शकते.
कोणतेही सप्लिमेंट घेण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा त्याचा आपल्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.