हिंदीसह १० भारतीय भाषांमध्ये साधणार संवाद
नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मॉडेल 'सर्वम एआय'चे लवकरच आगमन होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, हा भारतीय 'एआय' मॉडेल डिसेंबर २०२५ किंवा जानेवारी २०२६ पर्यंत तयार होईल. त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की ते स्वतः 'सर्वम एआय'चा वापर सुरू करणार आहेत.
काय आहे 'सर्वम एआय'?
बेंगळुरूस्थित स्टार्टअप कंपनी 'सर्वम एआय' प्रगत 'एआय' संशोधनाला वास्तविक जीवनात वापरण्यायोग्य बनवण्यासाठी काम करत आहे. 'सर्वम एआय'ने गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये एक सॉफ्टवेअर सादर केले होते, जे कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांशी केवळ मजकूर (टेक्स)ऐवजी बोलून (व्हॉइस) संवाद साधण्याची सुविधा देते. विशेष म्हणजे, या तंत्रज्ञानाला भारताच्या १० स्थानिक भाषांमधील डेटावर प्रशिक्षित करण्यात आले आहे, ज्यामुळे हे अनेक भारतीय भाषांना सपोर्ट करते. त्यामुळे वापरकर्ते आपापल्या भाषेत बोलून संवाद साधू शकतील. सध्या बाजारात असलेल्या चॅटजीपीटी आणि जेमिनी सारख्या 'एआय' चॅटबॉट्सपेक्षा 'सर्वम एआय' स्थानिक भाषांमध्ये वापरता येत असल्याने अधिक उपयुक्त ठरू शकते.
सर्वम एआयची महत्त्वाची वैशिष्ट्ये
१० भारतीय भाषांमध्ये करणार सपोर्ट : सुरुवातीला 'सर्वम एआय' हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मराठी, गुजराती, कन्नड, ओडिया, पंजाबी आणि मल्याळम यासह १० भाषांमध्ये व्हॉइस इंटरेक्शन आणि फ्रॉड डिटेक्शनची सुविधा देईल.
आधार सेवांमध्ये वापर : एप्रिलमध्ये, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने (यूआयडीएआय) आधार सेवा अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि जलद करण्यासाठी 'सर्वम एआय'सोबत भागीदारी केली आहे.
सुरक्षितता : हा 'एआय' सिस्टम आधार धारकांकडून त्यांच्या नोंदणी आणि अपडेटच्या प्रक्रियेबद्दल रिअल-टाइम फीडबॅक घेईल आणि कोण जास्त पैसे घेत नाही याची पडताळणी करेल. तसेच, प्रमाणीकरणा दरम्यान कोणतीही संशयास्पद कृती आढळल्यास, 'एआय' प्रणाली त्वरित फसवणूक अलर्ट देईल.
ऑटोमेशन : 'सर्वम एआय'ला रिअल-टाइममध्ये बोलून संवाद साधण्यासाठी आणि काही कामे आपोआप करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. 'सर्वम एआय' हे भारताला 'जनरेटिव्ह एआय'च्या पुढील मोठ्या टप्प्यासाठी एक महत्त्वपूर्ण टेस्टिंग ग्राउंड बनवते. लवकरच येणारा हा स्वदेशी 'एआय' भारताची आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील पकड मजबूत करेल.