भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट
विरार : विरार पश्चिम येथील विवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १९ वर्षीय रिचा सचिन पाटील या विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेची सखोल चौकशी करा अशी मागणी करण्यात आली आहे. आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या नेतृत्वात वसई विरार मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना भाजपच्या शिष्टमंडळाने शनिवारी या संदर्भात निवेदन दिले आहे.
रिचा पाटील या विद्यार्थिनीचे अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी एका युवकाने तिला दिली होती. त्यामुळे तिने याबाबत आपल्या वडिलांना माहिती दिली. रिचाचे वडील या प्रकाराबाबत संबंधित युवकाला जाब विचारण्याकरिता महाविद्यालयात गेले असता, चार-पाच युवकांनी त्यांना मारहाण केली. आपली बदनामी आणि वडिलांचा अपमान सहन न झाल्याने रिचा पाटील हिने १३ ऑक्टोंबर २०२५ रोजी आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेने संपूर्ण वसई-विरार शहर हादरले असून समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विवा कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांसह इतर बाहेरील व्यक्ती या घटनेला जबाबदार आहेत. वीवा कॉलेज प्रशासनाने या घटनेपूर्वीची तक्रार योग्यरीत्या हाताळली असती तर ही घटना टाळता आली असती असा आरोप करण्यात आला आहे.
तसेच रिचा पाटीलच्या आत्महत्येमागील कारणांचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात शनिवारी आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्यासह भारतीय जनता पार्टी वसई-विरार शहर जिल्हा अध्यक्षा प्रज्ञा पाटील आणि शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त कौशिक यांची भेट घेतली.
या शिष्टमंडळात जिल्हा सरचिटणीस जोगेंद्र प्रसाद चौबे, बिजेंद्र कुमार, मनोज बारोट, भूषण किणी, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा ज्योत्स्ना मेहेर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष विनीत तिवारी, योगेश सिंह, अश्विन सावरकर यांचा सहभाग होता. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, दोषींना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. “विद्यार्थिनींचे सुरक्षित शिक्षण हे आमच्यासाठी प्राधान्याचे आहे. प्रकरणातील सर्व बाजूंची सखोल आणि निष्पक्ष तपास तातडीने करण्यात येईल. अशी ग्वाही यावेळी पोलीस आयुक्तांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिली.
ही घटना फक्त एका विद्यार्थिनीची नाही तर असंख्य मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. कु .रिचा सारख्या निष्पाप विद्यार्थिनींना शिक्षणाच्या ठिकाणी असुरक्षितता जाणवणे ही चिंतेची बाब आहे. म्हणूनच या प्रकरणातील दोषींना कायद्याच्या चौकटीत राहून कठोर शिक्षा होणे अत्यावश्यक आहे. -
स्नेहा दुबे-पंडित, आमदार, वसई.