पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही मुस्लिम मुली शनिवार वाड्यात नमाज पठण करत असल्याचे दिसत असून, कुलकर्णींनी यावर संताप व्यक्त केला आहे.
कुलकर्णींनी आपल्या ट्विटमध्ये, “पुण्याचा अभिमान शनिवार वाडा! हे एक ऐतिहासिक वारसा स्थळ आहे की धार्मिक प्रार्थनेसाठी वापरलं जाणार ठिकाण ?” यापूर्वी सारसबागेत नमाज पठण केल्याची घटना घडल्याचा उल्लेख करत, त्यांनी आता शनिवार वाड्यातील प्रकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
व्हिडिओ नेमका कधीचा आहे, त्यामागील पार्श्वभूमी काय आहे, आणि त्याबाबत पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का ? यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी देखील यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटना या संघटनांनी आज (१९ ऑक्टोबर) सायंकाळी शनिवार वाड्याजवळ एकत्र येऊन शिव वंदना करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्वतः दिली आहे.
हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या काळात पुण्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं दिसत आहेत.