मुंबई : मुंबईत उद्योजकाला 'डिजीटल अरेस्ट' दाखवून ५८ कोटी रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर प्रकरणी सायबर क्राइम पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली असून पैशांचा माग काढणे सुरू आहे.
ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करुन उद्योजक आणि त्याच्या पत्नीला 'डिजीटल अरेस्ट' करुन त्यांना ५८ कोटींना लुटण्यात आले. आरोपींनी १८ बँक खाती वापरुन पैसे काढून घेतले. अब्दुल नासीर खुल्ली, अर्जुन कडवासरा,जेठाराम अशी आरोपींची नावे आहे.
डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजीटल स्वरूपात अटक
या प्रकारात एखादी व्यक्ती पोलीस असल्याचं सांगून किंवा ईडी किंवा सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगून मेसेज पाठवतो किंवा थेट व्हिडिओ कॉल करतो. तुम्हाला ड्रग्स किंवा मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट करत असल्याची बतावणी करतो. डिजिटल अरेस्ट मध्ये सायबर गुन्हेगार लोकांना सरकारी अधिकारी, पोलीस, किंवा कायदा अंमलबजावणी यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून भीती दाखवतात आणि पैशांची जबरदस्तीने वसुली करतात.