राम मंदिर स्टेशनवर लोकलमध्येच महिलेची प्रसूती; तरुणाने दाखवले धाडस
व्हिडिओ कॉलवर डॉक्टरच्या मदतीने केली मदत; कुटुंबाला रुग्णालयाने नाकारल्याने संताप
मुंबई: मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्टेशनवर मंगळवारी मध्यरात्री १ वाजता घडलेल्या एका घटनेने तमाम मुंबईकरांची मने जिंकली आहेत. लोकल ट्रेनमध्ये एका महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. यावेळी एका माणसाने त्वरीत पुढे येऊन प्लॅटफॉर्मवरच तिची प्रसूती करण्यासाठी मदत केली. त्याच्या या धाडसाची तुलना '3 Idiots' चित्रपटातील आमिर खानच्या 'रणछोड' या व्यक्तिरेखेसोबत केली जात आहे, ज्यामुळे त्याला 'रिअल लाईफ रणछोड' हे नाव मिळाले आहे.
या हृदयस्पर्शी घटनेचे विडिओ सोशल मीडियावर शेअर मनजीत ढिल्लन यांनी शेअर केले असून ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ढिल्लन यांच्या माहितीनुसार, त्या माणसाने महिलेला वेदनांमध्ये पाहिले आणि त्वरित ट्रेनची आपत्कालीन साखळी खेचून गाडी थांबवली. ढिल्लन यांनी लिहिले, "हा माणूस खरोखरच शूर आहे. त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. बाळ अर्धे बाहेर आणि अर्धे आत. देवाने त्याला तिथे खास कारणामुळे पाठवले होते, असे खरोखर वाटले."
विविध प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये, विकास बेंद्रे नावाचा तो माणूस त्या क्षणाबद्दल बोलताना ऐकू येतो: "पहिली बार किया है जीवन में मैंने ये. इतना डर लग रहा था ना पर व्हिडिओ कॉल पे मॅडमने हेल्प किया" (आयुष्यात मी हे पहिल्यांदाच केले आहे. मला खूप भीती वाटत होती, पण एका डॉक्टर मॅडमने व्हिडिओ कॉलवर मदत केली).
रुग्णालयाने मदत नाकारल्याचा आरोप
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पारंपारिक आपत्कालीन सेवांशी संपर्क साधण्यात विलंब झाल्यामुळे एका महिला डॉक्टरांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्याला प्रत्येक पायरीवर मार्गदर्शन केले आणि त्याने प्रत्येक सूचना पूर्णपणे पाळली. ढिल्लन यांनी एका त्रासदायक माहितीचा खुलासा केला की, महिलेच्या कुटुंबाने यापूर्वी जवळच्या रुग्णालयात मदत मागितली होती, परंतु कथितरित्या त्यांना मदत नाकारण्यात आली, ज्यामुळे त्यांना पुन्हा ट्रेनने प्रवास करावा लागला. "अशा परिस्थितीत रुग्णालयाने एका गरोदर महिलेला मदत करण्यास नकार देणे खरोखरच लाजिरवाणे आहे," असे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. यशस्वी प्रसूतीनंतर, प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने आई आणि नवजात बालकाला सुरक्षितपणे रुग्णालयात हलवण्यात आले.