चंदिगड : आयपीएस अधिकारी वाय. पूरण सिंग यांच्या आत्महत्येप्रकरणी हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रुघ्न कपूर यांना रजेवर पाठवण्यात आले आहे. रिक्त झालेल्या हरियाणाच्या पोलीस महासंचालक पदावर ओपी सिंग यांची कार्यवाहक पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंग हे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे मेहुणे आहेत. ते हरियाणा पोलीस गृहनिर्माण महामंडळ आणि एफएसएल मधुबनचे संचालक म्हणून काम करत होते. आता त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
वाय. पूरण सिंग यांनी आत्महत्या करण्याआधी लिहिलेल्या चिठ्ठीत ज्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं लिहिली आहेत त्या सर्वांवरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आत्महत्या करणारे वाय. पूरण सिंग हे २००१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते रोहतक येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात महानिरीक्षक (आयजी) म्हणून कार्यरत होते. त्यांनी ७ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. त्यांच्या आठ पानांच्या सुसाईड नोटमध्ये १३ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे होती ज्यांच्याविरुद्ध त्यांनी छळ आणि करिअरचे नुकसान करण्याचे गंभीर आरोप केले होते. यापैकी सर्वाधिक आरोप डीजीपी शत्रुघ्न कपूर आणि रोहतक एसपी यांच्यावर होते.
चिठ्ठीच्या मदतीने तपास सुरू आहे. रोहतकचे माजी पोलिस अधीक्षक (एसपी) नरेंद्र बिजार्निया यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आणि सुरिंदर सिंग भोरिया यांची रोहतकचे नवीन पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली. बिजार्निया यांना अद्याप नवीन पद देण्यात आलेले नाही. तपास पूर्ण होईपर्यंत डीजीपी शत्रुघ्न कपूर यांना रजेवर पाठवण्यात आले आहे. तसेच चंदीगड पोलिसांनी वाय. पूरण सिंग यांच्या पत्नीचा लॅपटॉप तपासासाठी मिळावा अशी विनंती केली आहे.
वाय. पूरण सिंग यांनी आत्महत्या केलेली नाही तर त्यांची हत्या झाली आहे, असा आरोप वाय. पूरण सिंग यांच्या पत्नीने केला आहे. यामुळे वाय. पूरण सिंग यांच्या चिठ्ठीत ज्या अधिकाऱ्यांची नावं आहेत त्यांना निलंबित करुन अथवा रजेवर पाठवून त्यांच्या विरुद्धचा तपास सुरू करण्यात आला आहे.