रत्नागिरी : खेड तालुक्यातील नातूनगर येथे मर्सिडीज बेंझ कारला आग लागली. सोमवारी मध्यरात्री २.५० च्या सुमारास ही घटना घडली. खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.
नाशिक येथील संदेश राजेश चवळे हे विन्हेरे येथून पुढे गणपतीपुळेच्या दिशेने चालले होते. कारमध्ये संदेश चवळेंसह एकूण तीन जण होते. प्रवास सुरू असताना गाडीने अचानक पेट घेतला. गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच आतील तिघेजण लगेच बाहेर आले. घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. कारला आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.