नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या नावावर एक नकोसा विक्रम (Unwanted Record) जमा झाला आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीत प्रथमच कुलदीपने एका डावात १०० किंवा त्याहून अधिक धावा दिल्या आहेत.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने 'फॉलो-ऑन'नंतर (Follow-on) दुसऱ्या डावात जबरदस्त फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना अक्षरशः थकवले. याच दरम्यान, पहिल्या डावात ५ बळी घेऊन हिरो ठरलेला कुलदीप यादव दुसऱ्या डावात पूर्णपणे निष्प्रभ ठरला.
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात कुलदीप यादवने आपल्या फिरकीची जादू दाखवत ८२ धावांत ५ बळी घेतले होते. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पाचवा 'फाइव्ह विकेट हॉल' होता. दुसऱ्या डावात कुलदीपची जादू चालली नाही. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी त्याला लक्ष्य केले आणि धावा वसूल केल्या. कुलदीपने २९ षटकांत १०४ धावा खर्च केल्या आणि त्याला फक्त ३ बळी मिळाले.
हा आकडा (१०४ धावा) कुलदीप यादवच्या ९ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत एका डावात दिलेली सर्वाधिक धावसंख्या आहे. यापूर्वी त्याला कधीही १०० धावांचा टप्पा पार करावा लागला नव्हता. यापूर्वीचा त्याचा सर्वाधिक धावसंख्या देण्याचा विक्रम ९९ धावांचा (ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी, २०१९) होता.
फॉलो-ऑनचा निर्णय चुकला?
भारताचा कर्णधार शुभमन गिलने वेस्ट इंडिजला फॉलो-ऑन देण्याचा निर्णय घेतला, परंतु वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांच्या शतकांच्या जोरावर जोरदार प्रतिकार केला. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या दोन्ही प्रमुख फिरकीपटूंना दुसऱ्या डावात प्रत्येकी १०४ धावा द्याव्या लागल्या, ज्यामुळे भारताला विजयासाठी शेवटच्या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे.