मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी १२ वी (HSC) आणि १० वी (SSC) दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक आगाऊ घोषित करण्यात आले आहे.
बारावीची लेखी परीक्षा मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षा देखील समाविष्ट आहेत.
तर, दहावीची लेखी परीक्षा शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, १८ मार्च २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार, बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार आहेत.
दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होतील.
या परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित केल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन सुलभ व्हावे आणि परीक्षेचा ताण कमी व्हावा या उद्देशाने या तारखा आगाऊ जाहीर करण्यात आल्या आहेत. विषयनिहाय अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.