मुंबई: भारतीय कर्णधार शुभमन गिल टेस्ट क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवत आहे. गिलने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. गिलचे हे कसोटी क्रिकेटमधील १० वे शतक आहे. या शतकामुळे त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
WTC मध्ये गिलने मोडला रोहित शर्माचा विक्रम
शुभमन गिल आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय फलंदाज बनला आहे. गिलने या बाबतीत माजी कर्णधार रोहित शर्मा याचा विक्रम मोडला आहे.
गिलने WTC मध्ये आतापर्यंत १० शतके झळकावली आहेत. रोहित शर्माने WTC मध्ये ९ शतके झळकावली होती. याच शतकी खेळीमुळे, शुभमन गिल WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाजही बनला आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या 'या' क्लबमध्ये सामील
शुभमन गिलने कर्णधार म्हणून २०२५ या कॅलेंडर वर्षात ५ वे कसोटी शतक पूर्ण केले आहे. या कामगिरीसह गिलने विराट कोहलीच्या खास विक्रमाची बरोबरी केली आहे. एका कॅलेंडर वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या भारतीयांमध्ये गिलने विराट कोहलीची बरोबरी साधली आहे.विराटने २०१७ आणि २०१८ मध्ये दोन वेळा ही कामगिरी केली होती.
दुसऱ्या कसोटीत गिलची कामगिरी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कर्णधार शुभमन गिलने नाबाद १२९ धावांची खेळी केली. त्याने या दरम्यान १६ चौकार आणि २ षटकार मारले. गिलच्या या खेळीमुळे भारताने आपला पहिला डाव ५१८/५ धावांवर घोषित केला. यशस्वी जयस्वालनेही १७५ धावांची शानदार खेळी केली.