दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, बॉलिवूड ग्लॅम दीपिका पादुकोण आणि बिग बी यांच्या कल्की २८९८ एडी या चित्रपटाने २०२४ मध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवत कोटींची कमाई केली. या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यावेळी सुमतीच्या भुमिकेसाठी दीपिकाचा चेहरा नसल्याचे चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी अधिकृतपणे जाहिर केले आहे. यामुळे सुमतीची भूमिका कोण करणार यावर चर्चा सुरु असतानाच आलिया भटचे नाव समोर येत आहे.
कल्की २८९८ एडी या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दीपिका दिसणार नसल्याच्या अधिकृत घोषणेत दिग्दर्शक नाग आश्विन म्हणाले की, "खूप विचार केल्यानंतर आम्ही आमचे रस्ते बदलण्याचा निर्णय घेतला.कल्की २८९८ एडी सारख्या चित्रपटाला वचनबद्धता गरजेची आहे. पुढील कामासाठी त्यांना शुभेच्छा!" या अधिकृत घोषणेमुळे दीपिका चित्रपटात दिसणार नाही या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.
भविष्यात कल्की हा विष्णुचा दहावा आणि शेवटचा अवतार निर्माण झाल्यावर जगात काय परिस्थिती असेल, यावर भाष्य करणारा हा काल्पनिक चित्रपट होता. या चित्रपटाचा सिक्वेल २०२६ मध्ये येणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये सुमतीची भुमिका आलिया भट करणार असल्याची कोणतीच अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही.