नोर्वे: मागील अनेक दिवसांपासून यावर्षीच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरु होती. अखेर १० सप्टेंबरच्या सायंकाळी नोबेल पुरस्कार समितीने यावर्षीच्या विजेत्यांची नावे जाहीर केली. ज्यात नोबेल शांतता पुरस्कार २०२५ चा मान मारिया कोरिना मचाडो यांना मिळाला आहे. मात्र मारिया कोरिना मचाडो यांचे कार्य काय आणि त्यांची ओळख काय हा प्रश्न अनेकांना पडला. जाणून घेऊया त्यांच्या कार्याबद्दल!
व्हेनेझुएलातील आयर्न लेडी म्हणून मारिया कोरिना मचाडो यांची ओळख सांगितली जाते. त्यांचे शिक्षण अभियांत्रिकी क्षेत्रात झाले असले तरी त्या राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देणे आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे शांततापूर्ण परिस्थितीमध्ये काम करणे अशी त्यांच्या कार्याची ओळख आहे. मचाडो यांची सुमाते नावाची संघटनादेखील आहे. जी लोकशाहीच्या भल्यासाठी काम करते. देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेतल्या पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे. यासाठी त्या मागील २० वर्षांपासून शांततेने संघर्ष करत आहेत.
मारिया यांच्या नावाची घोषणा करताना नोबेल समितीने म्हटले की, "जगातील अनेक भागांमध्ये हुकुमशाही वाढत असताना आणि लोकशाही कमकुवत होत असताना मारिया कोरिना मचाडो यांच्यासारख्या व्यक्तीचे धाडस आशादायक आहे. लोकशाही ही चिरंतन शांततेची पूर्वअट आहे. ज्यावेळी सत्ताधारी हिंसा आणि भीतीद्वारे जनतेला दडपते तेव्हा अशा धाडसी व्यक्तींचा सन्मान करणे आवश्यक ठरते."