Sunday, November 9, 2025

सॅमसंगचा नवीन बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी एम१७ लाँच

सॅमसंगचा नवीन बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी एम१७ लाँच

मुंबई : कोरियन टेक दिग्गज सॅमसंगने आज भारतीय बाजारपेठेत आपल्या लोकप्रिय एम-सिरीज अंतर्गत नवीन बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी एम१७ लाँच केला आहे. हा मॉडेल गॅलेक्सी एम१६चा अपग्रेडेड प्रकार असून, आकर्षक डिझाइन आणि दमदार वैशिष्ट्यांसह तो मध्यम श्रेणीतील ग्राहकांना लक्षात घेऊन सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये ५ एनएम-आधारित एक्सिनोस १३३० चिपसेट, ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच, यात ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि ५००० एमएएच क्षमतेची शक्तिशाली बॅटरी आहे.

या नवीन मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये देण्यात आलेले एआय-आधारित सर्कल टू सर्च टूल, जे आधी फक्त सॅमसंगच्या एस-सिरीजमध्ये उपलब्ध होते. या सुविधेमुळे वापरकर्त्यांना स्क्रीनवरील कोणताही घटक सहज आणि जलद शोधता येतो, त्यामुळे फोनचा वापर आणखीन स्मार्ट आणि सोयीस्कर बनतो.

गॅलेक्सी एम१७ 5जीचा बेसिक 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 12,499 रुपयांपासून सुरू होतो. दरम्यान, 6GB RAM पर्यायाची किंमत 13,999 रुपये आणि 8GB RAM पर्यायाची किंमत 15,499 रुपये आहे. लॉन्च ऑफरचा भाग म्हणून, ग्राहक सवलतीच्या दरात डिव्हाइस खरेदी करू शकतील. लाँच ऑफरमुळे 4GB, 6GB आणि 8GB व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 11,999 रुपये, 13,499 रुपये आणि 14,999 रुपये मिळू शकते.

या डिव्हाइसची विक्री १३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारतीय बाजारात हा फोन रेडमी नोट १४ ५जी, आयक्यू झेड१०एक्स आणि रिअलमी नार्झो ७० टर्बो सारख्या लोकप्रिय मॉडेल्सना टक्कर देईल.

या फोनमध्ये ६.७ इंचाचा सुपर अमोलेड फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २३४० पिक्सेल आहे आणि ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह तो अधिक स्मूथ अनुभव देतो. स्क्रीनचे संरक्षण गोरिल्ला ग्लास व्हिक्टसद्वारे करण्यात आले आहे. फोटोग्राफीच्या दृष्टीने, या डिव्हाइसमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून ५० एमपी मुख्य लेन्ससह OIS सपोर्ट, ५ एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स आणि २ एमपी मॅक्रो लेन्स दिली आहे. सेल्फीसाठी १३ एमपीचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

फोन अँड्रॉइड १५ वर आधारित वन यूआयवर चालतो आणि कंपनीने सहा वर्षांपर्यंत सुरक्षा तसेच ओएस अपडेट्सची हमी दिली आहे. पॉवरसाठी यात ५००० एमएएच बॅटरी असून ती २५W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, मात्र चार्जर बॉक्समध्ये दिलेला नाही.

Comments
Add Comment