मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या यादीतील नावे https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येत आहे. त्या आधारे तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय; तसेच नगरपरिषद/ नगरपंचायतीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची लिंक (दुवा) राज्य निवडणूक आयोगाच्या https://mahasec.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध असेल. त्याचबरोबर नगरपरिषद व नगरपंचायतीची प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतीच्या कार्यालयात उपलब्ध असेल.
जिल्हा परिषद/ पंचायत समित्या, नगरपरिषदा/ नगरपंचायती इत्यादींच्या मतदार यादीसाठी प्रतिपृष्ठ दोन रुपयेप्रमाणे शुल्क भरावे लागेल.
प्रारूप व अंतिम मतदार यादीची विनाछायाचित्राची पीडीएफ प्रत https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/DownloadVoterlist या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.