ऋतुराज : ऋतुजा केळकर
आरत्या दीपज्योतिः
प्रकटते हृदि भक्तस्य निर्मलम्।
तमोहरं ज्ञानदं च,
शांतिकरं च सदा शुभम्॥
गंधवात्याः पुष्पवृष्ट्या, नादमंगलसंयुतम्।
भक्तिभावसमायुक्तं, हृदयस्पर्शकं सत्यम्॥
नमः श्रीगुरुदेवाय, नमः श्रीपरमात्मने।
आरत्या तेजसा नित्यं,
जाग्रतं मे मनः सदा॥
लिहिता लिहिता माझा हात थबकला आणि शब्दांच्या अर्थाचे तरंग मनाच्या खोल डोहात कुठेतरी तरंगू लागले. कारण दीपज्योती जशी मंद प्रकाशात हळूहळू उगम पावते, तशीच आरतीची सुरुवात मनाच्या गाभाऱ्यात होते. निर्मळ भक्ताच्या हृदयात जेव्हा श्रद्धेचा दीप उजळतो, तेव्हा त्या प्रकाशात अज्ञानाचा अंध:कार विरघळतो. आरती म्हणजे केवळ दिवा ओवाळणे नव्हे, ती म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी होणारा संवाद. त्या तेजस्वी लहरीत ज्ञानाचा झरा वाहतो, शांतीचा स्पर्श होतो आणि मनात एक शुभ, पवित्र कंपन जागृत होते. गंधाच्या मंद लहरी, पुष्पांची साजिरी वृष्टी आणि नादमंगलाचा ताल हे सारे आरतीत एकत्रित गुंफलेले असते. त्या क्षणात भक्ती ही केवळ भावना न राहता, ती एक अनुभव बनते हृदयाला स्पर्श करणारा, अंतर्मनात रुजणारा. आरती म्हणजे आत्मा परम तेजाकडे झेपावतो, गुरूच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्या तेजाने मन सदैव जागृत राहते.
आरतीचा इतिहास सांगताना शब्द जणू काळाच्या ओघात वाहू लागतात, जसे एखाद्या पुरातन नदीच्या प्रवाहात स्मृतींचे दीप तरंगत जातात. हा केवळ धार्मिक विधी नव्हे, तर आरती करणे म्हणजे भारतीय संस्कृतीच्या अंतरंगातून उमटलेली एक दिव्य लय आहे. वैदिक यज्ञकर्मात अग्नीला अर्पण केलेल्या समिधा, मंत्रांचे उच्चार आणि दीपप्रज्ज्वलनाच्या त्या तेजस्वी क्षणांत आरतीचा बीजांकुर रुजलेला दिसतो. त्या काळात देवतेला अर्पण केलेला प्रकाश म्हणजे तिच्या तेजस्वी स्वरूपाची मौन प्रार्थना होती जिथे शब्द नव्हते, पण भाव होते.
पुढे भक्तीसंप्रदायांच्या उदयाने आरतीला भावनांचा, भक्तीचा आणि संगीताचा नवा साज चढला. संतांच्या ओव्या आणि अभंगांतून आरतीने एक नवा सूर पकडला, तो सूर केवळ गाण्याचा नव्हता, तो आत्म्याच्या गाभ्यातून उमटणारा होता. आरती ही विधी न राहता एक अंतःस्पर्शी अनुभूती बनली. मंदिरात, घरात, यात्रेत जिथे जिथे श्रद्धेचा दीप उजळतो, तिथे तिथे आरतीचा स्वर गुंजतो. टाळ, मृदंग, घंटा यांच्या नादात जेव्हा आरती गातात, तेव्हा त्या लयीत भक्तांचे मन जणू एकाच प्रकाशात विलीन होते.
धार्मिक विधीतील आरतीचा सहभाग म्हणजे पूजेचा शिखरबिंदू. पूजेच्या शेवटी जेव्हा दिवा ओवाळला जातो, तेव्हा तो केवळ प्रकाशाचा अर्पण नसतो तो असतो मनातील श्रद्धेचा तेजस्वी झोत की जो त्या क्षणात भक्त देवतेच्या सान्निध्यात स्वतःला विसरतो आणि त्या तेजात एकरूप होतो. आरती म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी होणारा ‘मौन संवाद’ जिथे शब्द थांबतात आणि भाव बोलू लागतात.
आरती ही परंपरा आहे, पण ती परंपरेच्या चौकटीत अडकलेली नाही. ती काळाच्या ओघात बदलत गेली, पण तिचा आत्मा हा भक्ती, समर्पण आणि दिव्यता असा आतून तो तसाच कायम राहिला. म्हणूनच आरती ही केवळ शब्दांची रचना नाही, ती एक प्रकाशयात्रा आहे, जी मनाच्या गाभाऱ्यातून सुरू होते आणि आत्म्याला परम तेजाकडे घेऊन जाते. ती एक अशी अनुभूती आहे, जिथे दीप जळतो, पण अंध:कार नाहीसा होतो, जिथे मन गातं, पण आत्मा मौनात न्हालेला असतो.
आरती ही केवळ पूजेतील एक विधी नाही, ती जीवन जगण्याची एक शैली आहे. प्रत्येक जीवाला परमेश्वराने एक नियोजित कार्य देऊनच या पृथ्वीवर पाठवले आहे. ते कार्य करताना आपण तन, मन आणि धन अर्पण करतो जणू जीवनाचीच आरती गातो. जीवाचा धूप म्हणजे त्याचे भाव, कर्माचा दीप म्हणजे त्याचे प्रयत्न आणि परिश्रमाच्या टाळ-मृदंगाच्या गजरात तो आपले नियोजित कार्य पूर्ण करतो. हे समर्पण कुठलाही तरतमभाव न ठेवता, पूर्ण श्रद्धेने केले जाते. म्हणूनच, आरती ही केवळ देवतेसाठी नसते ती जीवनासाठी असते, आत्म्याच्या तेजाकडे झेप घेणाऱ्या प्रत्येक क्षणासाठी असते.