नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष म्हणजेच शिवसेना असा निर्णय देत त्यांनाच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिले. या निर्णयाला उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने हंगामी स्थगिती दिलेली नाही. पूर्ण सुनावणीअंती निर्णय देऊ असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाची अंमलबजावणी निवडणूक प्रक्रियांमध्ये होत आहे. सध्याची स्थिती बघता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाकडेच असेल, असे कायदेतज्ज्ञ सांगत आहेत.
राज्यात होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह याचा वापर होऊ नये यासाठी उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण सर्वोच्च न्यायालयात अद्याप निर्णय झालेला नाही तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती पण देण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह या संदर्भात पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.