पालघर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव
पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले आहे. डहाणू नगर परिषदेत सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण तर महत्त्वपूर्ण अशा पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावर ओबीसी अर्थात नागरिकांचा मागासवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे.
सन २०१९ मध्ये झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीच्या आरक्षणात डहाणू नगराध्यक्षपद सर्वसाधारण म्हणून आरक्षित होते. आगामी निवडणुकासाठी आता झालेल्या सोडतीत या नगर परिषदेसाठी पुन्हा सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. जव्हार नगर परिषदेत या आधी ओबीसी साधारण असे आरक्षण होते. सोमवारी निघालेल्या आरक्षणात जव्हारमध्ये सर्वसामान्य स्त्री असे आरक्षण पडले आहे. पालघर नगर परिषदेत यापूर्वी सर्वसाधारण स्त्रीचे आरक्षण होते.
आता हे आरक्षण ओबीसी अर्थात नागरिकांचा मागसवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे. दरम्यान, डहाणू, पालघर आणि जव्हार नगर परिषदेवर २०१९ मध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून घेण्यात आली होती. त्यावेळी डहाणूमध्ये भाजपचे भरत राजपूत, जव्हारमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत पटेल आणि पालघरमध्ये महाविकास आघाडीच्या डॉ. उज्ज्वला काळे निवडून आल्या होत्या. त्यानंतर आता तिन्ही नगर परिषदांचा कार्यकाळ संपल्यामुळे तिथे आता प्रशासक कार्यरत आहेत. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, प्रभागाचे आरक्षण देखील ८ ऑक्टोबर रोजी जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे नगर परिषद क्षेत्रात नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच पाहावयास मिळणार आहे.