मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प टप्पा ३ (ब) मधील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील जुळे बोगदे प्रकल्प स्थळ तसेच मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्प स्थळास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शनिवारी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट दिली. तसेच, पॅकेज ए, बी आणि सी, डी आणि इ अंतर्गत होऊ घातलेल्या कामकाजाची पाहणी केली. उपायुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी यांच्यासह संबंधित अधिकारी व प्रकल्प सल्लागार या पाहणी दौऱ्यास उपस्थित होते.
गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गत रस्ता संरेखनाच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर गगराणी यांनी चर्चा केली. टप्पा ३ (ब) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे १.२२ किलोमीटर लांबीचा तिहेरी मार्गिका असलेला पेटी बोगदा (कट अँड कव्हर) तसेच बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्या जुळ्या बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किलोमीटर आहे. हा जुळा बोगदा जमिनीखाली २० ते १६० मीटर खोल भागात आहे. प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. सर्व बाबींची सविस्तर माहिती महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी घेतली. तसेच, आवश्यक ते निर्देश दिले.
मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पांतर्गत चारकोप स्थळास प्रत्यक्ष भेट दिली. तसेच, पॅकेज बी, सी, डी आणि इ अंतर्गत होऊ घातलेल्या कामकाजाची पाहणी केली. याशिवाय पश्चिम उपनगरातील मालाड मरिना एन्क्लेव्ह, चारकोप येथील सेक्टर ८, गोराई क्षेपणभूमी, गोराई खाडी परिसर, एक्सर मेट्रो स्थानक परिसर, कांदळपाडा मेट्रो स्थानक परिसर, दहिसर (पश्चिम) येथील आनंद पार्क या ठिकाणांवरील कामांचा त्यांनी आढावा घेतला. विशेषतः सुटे भाग निर्मितीकरिता जमिनीची उपलब्धता, बांधकाम, कार्यस्थळाकडे जाणारे पोहोच रस्ते यांची सविस्तर माहीत गगराणी यांनी घेतली.