विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत झाली होती. प्रवाशांनी खचाखच भरलेली ही बोट समुद्रातच अडकून पडल्याने प्रवाशांमध्ये काहीसा गोंधळ झाला होता.
नेमकी घटना काय?
रविवारी संध्याकाळच्या सुमारास सफाळ्याच्या जालसार जेट्टीवरून निघालेली रो-रो फेरीबोट विरारच्या नारिंगी जेट्टीजवळ पोहोचण्यापूर्वी समुद्रात अडकली. ही बोट प्रवाशांनी भरलेली होती.
हायड्रोलिक पंप तुटला आणि बोट अडकली
मिळालेल्या माहितीनुसार, नारिंगी जेट्टीवर बोटीला किनाऱ्यावरील 'रॅम्प'शी (उतार असलेला जोडणीचा भाग) जोडणाऱ्या हायड्रोलिक यंत्रणेचा पाईप तुटला. यामुळे रॅम्प वर-खाली करणे शक्य झाले नाही आणि बोट समुद्रातच थांबून राहिली. दरम्यान, या प्रकारामुळे प्रवाशांची काहीशी गैरसोय झाली.
त्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या (MMB) अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर बोट जेट्टीवर सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली. या बोटीवरील सर्व प्रवासी तसेच गाड्यांना सुखरूप खाली उतरवण्यात आले.
याबाबत मंत्री नितेश राणे यांनीही ट्वीट करत ही माहिती दिली. पाहा काय म्हणाले नितेश राणे