कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग सामन्यात टॉस दरम्यान एक मोठा गोंधळ झाला आहे. या घटनेत मॅच रेफरीने चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप होत असून, त्यामुळे भारतीय संघाची स्पष्टपणे अडवणूक झाल्याचे बोलले जात आहे.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक केली आणि पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने "टेल्स" असा कॉल केला. मात्र, नाणे "हेड्स" असे पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे नियमानुसार भारताने टॉस जिंकला असता. पण मॅच रेफरी शँड्रे फ्रिट्झ आणि टॉस होस्ट मेल जोन्स यांनी "हेड्स" कॉल असल्याचे सांगितले आणि पाकिस्तानला विजयी घोषित केले.
यानंतर, फातिमा सनाला निर्णय विचारण्यात आला आणि तिने लगेच गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सगळ्या घडामोडी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
हरमनप्रीत कौरने त्याक्षणी काही प्रतिक्रिया दिली नाही, त्यामुळे तिला कॉल योग्य ऐकू आला नव्हता का? याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. पण प्रेक्षक आणि सोशल मीडियावर यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, कारण टॉसचा निर्णय हा मॅच रेफरी आणि प्रेझेंटरकडून स्पष्ट आणि अचूक दिला जाणे आवश्यक असते.
क्रिकेटसारख्या खेळात अशा चुका क्वचितच पाहायला मिळतात, पण जेव्हा भारत-पाकिस्तानसारखा उच्च तणाव असलेला सामना असतो, तेव्हा अशा गोष्टींकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाते. या प्रकारामुळे सामन्याच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.