याआधी दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कात उद्धव यांनी त्यांच्या समर्थकांना मार्गदर्शन करण्यासाठी सभा घेतली. या सभेतून उद्धव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला. केंद्र सरकारकडे पैसे आहेत, पण महाराष्ट्राबद्दल असलेल्या द्वेषामुळे ते मदत करत नाहीत. शेतकरी मुसळधार पाऊस आणि पुरामुळे अडचणीत सापडला आहे. पण केंद्र आणि राज्य सरकार त्याला मदत देत नसल्याचा आरोप उद्धव यांनी केला. बिहारची निवडणूक जवळ येताच पंतप्रधान तिथल्या महिलांना सरकारी योजनेतून पैसे देतात पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी मदत देत नाहीत; असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केली. विशेष म्हणजे महाराष्ट्राला सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सहा हजार ४१८ कोटींचा आगाऊ हप्ता मिळाला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारचे आभार मानले आहेत. केंद्राने पुराच्या संकटावर लवकरच मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी केलेल्या टीकेमुळे नेत्यांमधील शाब्दीक संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंचे हिंदुत्वावरील प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम, दरेकरांची टीका
उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी रोखठोक शब्दात टीका केली. उद्धव ठाकरेंचे हिंदुत्वावरील प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे; असे ते म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या सभेला जेवढी हवा केली त्या तुलनेत गर्दीच झाली नाही, असेही ते म्हणाले. मतांसाठी हिंदुत्व सोडणाऱ्या उद्धव यांच्यापासून त्यांची हक्काची माणसं आणि समर्थक दूर जाऊ लागल्याचे हे निदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.