दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नेस्को सेंटरमधील मेळावा शेतकऱ्यांच्या मदतीवर केंद्रित होता, तर उद्धव ठाकरे गटाचा शिवाजी पार्कमधील मेळावा राजकीय आरोपांवर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हजारो शिवसैनिक उपस्थित होते. मात्र यंदा दसऱ्याच्या पारंपरिक उत्साहात मिसळलेला होता तो पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनेचा सूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सुरुवातच बळीराजाच्या संकटाने केली. "राज्यात आलेल्या महापुरामुळे शेतकरी कोलमडलाय. बळीराजा आज संकटात आहे. शिवसेना कायम त्याच्या पाठीशी उभी राहील," असं म्हणत त्यांनी शिवसैनिकांना मदतीचं आवाहन केलं. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले कार्यकर्ते उभे आहेत. बळीराजाला मदतीचा हात द्या, असं त्यांनी म्हटलंय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आलेत. त्यांनी शेतकऱ्यांची दु:ख जवळून पाहिलीत. त्यामुळे त्यांनी समाजकारणाचं व्रत सोडणार नसल्याचा निर्धार केलाय. जिथे संकट तिथे शिवसेना उभी, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलीय.
एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचा शब्द त्यांनी दिलाय. शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये, त्यांची दिवाळी काळी जाऊ देणार नाही, असं वचनच शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलंय.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. सरकारने आधीच मदत जाहीर केलीय. अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते गावोगावी पोहोचले असल्याचंही त्यांनी सांगितलंय. शिंदे यांना शेतकऱ्यांची काळजी आहे. त्यामुळे त्यांनी पूरग्रस्त भागातील शिवसैनिकांना मेळाव्यात न येण्याचे आवाहन केलं. त्याऐवजी ज्यांच्या घरात दसरा साजरा होत नाही, अशांना मदत करा, असे निर्देश दिले. हे बाळासाहेब ठाकरे यांच्या 'ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण' या धोरणाचं जिवंत उदाहरण आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे शेतकरी केंद्रित आश्वासन महाराष्ट्राच्या राजकारणात एक नव वळण आहे. जेव्हा शेतकरी संकटात असतो, तेव्हा राजकीय नेते फक्त घोषणा देतात, मात्र शिंदे यांनी कृतीनं उत्तर दिलंय. दिवाळीपूर्वी मदत हे केवळ वचन नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्याचा हा मोठा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात दरवर्षी शेकडो शेतकरी आत्महत्या करतात आणि अतिवृष्टीमुळे हे प्रमाण वाढलंय. शिंदे सरकारने 50 हजार रुपयांपर्यंतची मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. हे बळीराजाच्या रक्तातून उभे राहिलेले सरकार आहे, जे बाळासाहेबांच्या वारशाला जपते. उद्धव ठाकरे गटाने हेक्टरी 50 हजारांची मागणी केली, मात्र शिंदे यांनी ती प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी घेतली.
याच मेळाव्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर साधलेला थेट निशाणा. "मी व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा नाही, मी फेसबुक लाईव्ह करणारा नाही," असं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंच्या दौऱ्याची चिरफाड केलीय. संकटकाळी घरात बसणारे शिवसैनिक नाहीच, असा थेट वार केलाय. ज्यांना आम्ही ऑलरेडी चिखलात लोळवलेलं आहे त्यांनी आमच्यावर चिखल फेकण्याचा प्रश्नच येत नाही, असा घणाघात शिंदेंनी ठाकरेंवर केलाय.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत. "पक्षप्रमुख नव्हे, हे तर कटप्रमुख आहेत," असा सणसणीत टोलाही हाणलाय. उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली, मात्र शिंदे यांनी या दौऱ्यावरून ठाकरेंवर निशाणा साधला. "घरात बसून फेसबुकवर बोलणं नव्हे, मैदानात उतरणं गरजेचं," अशी जळजळीत टीकाही त्यांनी केलीय. "बाळासाहेब आज असते तर त्यांनी माझी पाठ थोपटली असती. जिथे संकट असेल, तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे धावून जाणारच. मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण," असंही शिंदे यांनी ठाकरेंना सुनावलंय.
एकनाथ शिंदे यांचा हा ठाकरेंवरचा हल्ला केवळ वैयक्तिक नाही, तर विचारसरणीचा आहे. बाळासाहेबांची शिवसेना ही रस्त्यावरची, शेतकऱ्यांसोबतची होती. एकनाथ शिंदे यांचा हा मेळावा शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे. दसऱ्या मेळाव्यात विचारांच्या सोन्यापेक्षा शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा वरचढ ठरला, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.