मुंबई : गोरेगावच्या नेस्को मैदानावर आज (गुरुवार २ ऑक्टोबर २०२५) शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तर दादरला शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंनी राजकीय सभेचे आयोजन केले आहे. या व्यतिरिक्त दसऱ्याच्या निमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर निवडक विसर्जन मिरवणुकाही असतील. अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम, रावणदहन , तसेच अनेक मंडळांच्या देवींच्या मूर्तींचे विसर्जन असेल. यामुळे संपूर्ण मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त असेल. विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्यांवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
मुंबईत महत्त्वाच्या तसेच संवेदनशील ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त आहे. पोलिसांची गस्ती पथके वारंवार गस्त घालतील. नेस्को मैदानावर वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त असेल. उद्धव ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणी पोलिसांचा पहारा असेल. शिवसेनेच्या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक गोरेगावमध्ये येतील तर उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेऊन पोलिसांनी पुरेशी खबरदारी घेतली आहे. मुंबईत रस्ते, रेल्वे आणि बस मार्गाने प्रवेश करण्याच्या सर्व ठिकाणांवरही पोलिसांची करडी नजर असेल. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा, ड्रोन, साध्या गणवेशातील पोलीस आणि वर्दीतले पोलीस यांच्यात समन्वय असेल. गस्तीचे प्रमाण वाढवले जाईल. सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला जाईल. कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मुंबईतील बंदोबस्तासाठी सात अतिरिक्त पोलिस आयुक्त, २६ पोलिस उपायुक्त, ५२ सहायक पोलिस आयुक्त, २,८९० पोलिस अधिकारी, सोळा हजार ५५२ पोलिस अंमलदार, एसआरपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथके, दंगल नियंत्रण पथके, डेल्टा, कॉम्बॅक्ट, तसेच होमगार्ड यांचा ताफा असेल.
पोलीस हेल्पलाईन : १०० / ११२