मुंबई: दसऱ्याचं वातावरण असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सभांचा आणि टीझर्सचा धडाका सुरू आहे. राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलंय ते शिवसेनेतल्या या दोन गटांच्या दसरा मेळाव्याकडे. ठाकरे गट शिवाजी पार्कवर, तर शिंदे गट नेस्को ग्राउंडवर आपली ताकद दाखवणार आहे. पण त्याआधी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लाँच केलेला एक ६० सेकंदाचा टीझर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा घडवतोय. हा टीझर केवळ मेळाव्याची तयारी नाही, तर शिंदे गटाची नवी राजकीय स्ट्रॅटेजी दाखवतोय. या स्ट्रॅटेजीचा थेट संबंध 'ठाकरे ब्रँड'शी आहे. काय आहे हा टीझर? याचे राजकीय संदर्भ, पडसाद आणि परिणाम काय असतील?
शिवसेनेत फूट पडल्यापासून दोन्ही गटांसाठी दसरा मेळावा हा केवळ एक कार्यक्रम राहिलेला नाही; तो शिवसेनेवरचा हक्क सिद्ध करण्याची मोठी राजकीय लढाई आहे. दोन्ही गटांकडून बॅनर, होर्डिंग्ज आणि सोशल मीडियावर वातावरण निर्मिती सुरू असताना, शिंदे गटाने एक जबरदस्त टीझर लाँच केलाय. या टीझरमधले शब्द ऐका— "दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचा अंगार... हिंदुत्वाचा हुंकार... स्वाभिमानी वादळ... वाघाची भगवी डरकाळी..." हे सगळे शब्द ठाकरे गटाच्या पारंपरिक भाषेला उत्तर देणारे आहेत. पण, खरी गेमचेंजर लाइन पुढे आहे: 'महाराष्ट्रामध्ये ब्रँड एकच शिवसैनिक...' आणि 'बाळासाहेबांचे भगवं स्वप्न शिवसैनिकच पूर्ण करणार.'
या दोन लाईन्समध्ये शिंदे गटाने थेट 'ठाकरे ब्रँड'ला चॅलेंज केलं आहे. सध्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. जर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तर मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये 'ठाकरे ब्रँड' अत्यंत प्रभावी ठरू शकतो आणि याचा मोठा फटका एकनाथ शिंदे गटाला बसू शकतो. या संभाव्य धोक्याची जाणीव असल्यामुळेच, शिंदे गटाने आता भावनिक राजकारण सुरू केलंय. त्यांनी टीझरमधून स्पष्ट संदेश दिला आहे की, शिवसेना म्हणजे केवळ एक कुटुंब किंवा एक व्यक्ती नाही, शिवसेना म्हणजे 'शिवसैनिक'!
हिंदुत्वाचं देणं, भगव्याचं लेणं
चला लुटायला
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं सोनं ...#Shivsena #EknathShinde pic.twitter.com/H3D6yF8M3G
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) October 1, 2025
शिंदे गट आता ठाकरे कुटुंबाच्या नेतृत्वाऐवजी बाळासाहेबांच्या विचारांवर काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला, शिवसैनिकाला ब्रँड म्हणून पुढे करत आहे. हा 'ठाकरे ब्रँड' विरूद्ध 'शिवसैनिक ब्रँड' असा थेट संघर्ष सुरू झालाय. हा टीझर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नक्कीच चिथावणी देणारा आहे. आता उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाच्या या दाव्याला काय प्रत्युत्तर मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकंदरीत, शिंदे गटाने हा ६० सेकंदाचा टीझर केवळ मेळाव्यासाठी नाही, तर आगामी मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुकांसाठीची आपली रणनीती स्पष्ट करण्यासाठी लाँच केलाय. त्यामुळे शिंदे गट 'ठाकरे' कुटुंबाला बाजूला सारून 'शिवसैनिक' हाच खरा ब्रँड सिद्ध करू शकेल का? की बाळासाहेबांच्या नावावर आजही ठाकरे कुटुंबाचीच व्होट बँक कायम राहील? या दसरा मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय असेल?