मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन
कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या चिमुकलीचा साप चावल्याने मृत्यू झाला होता. याचवेळी त्या सापाने मुलीच्या मावशीला देखील दंश केला होता. तिच्यावर देखील उपचार सुरू होते, मात्र उपचार सुरू असताना सोमवारी रात्री तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त करत मृतांच्या नातवाईकांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करत ठिय्या मांडला. याप्रकरणी दोषी डॉक्टर आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
डॉक्टरांनी सुरुवातीला दोघांचीही तब्येत 'व्यवस्थित' असल्याचे सांगितले. मात्र, एका तासाच्या उपचारानंतर प्राणवीची तब्येत अचानक बिघडली. परिस्थिती गंभीर झाल्याचे पाहून कुटुंबीयांनी तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. पण दुर्दैवाने, तिला रुग्णालयातून हलवण्यापूर्वीच शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच तिने अखेरचा श्वास घेतला. मुलीची मावशी श्रुतीवर मात्र एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. श्रुतीचे पुढील महिन्यात लग्न होते. त्याची तयारी देखील सुरू होती. मात्र या घटनेनंतर आनंदीत असणाऱ्या घरात दु:खाचे सावट पसरले आहे.
साप चावल्यावर केडीएमसीच्या रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाहीत आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाइकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या मयत मुलीच्या कुटुंबीयांनी व नागरिकांनी शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. नातेवाईक सत्यवान म्हात्रे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील आदींनी थेट मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आणि उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याला जाब विचारत धारेवर धरले, तर याप्रकरणी दोषींवर कारवाई न झाल्यास केडीएमसी रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.