दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले असले तरी, पारितोषिक वितरण समारंभातील नाट्यमय घडामोडींमुळे ट्रॉफीचा वाद चांगलाच चिघळला आहे. भारतीय संघाने एशियन क्रिकेट काऊन्सिलचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिल्यानंतर नक्वी हे ट्रॉफी घेऊन मैदानातून निघून गेले होते.
या संपूर्ण प्रकरणावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आक्रमक झाले असून, मंगळवारी दुबईत झालेल्या एसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) बीसीसीआयच्या प्रतिनिधींनी हा मुद्दा जोरदारपणे उचलून धरला.
राजीव शुक्लांचा नक्वी यांना थेट सवाल
बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करत असलेले उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या बैठकीत मोहसीन नक्वी यांना थेट प्रश्न विचारला. "विजेत्या संघाला ट्रॉफी का सोपवण्यात आली नाही? ही एसीसीची ट्रॉफी आहे, कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. ती औपचारिक पद्धतीने विजेत्या संघाला दिली जावी लागते," असे शुक्ला यांनी स्पष्टपणे सांगितले.
मोहसीन नक्वींचे स्पष्टीकरण
यावेळी मोहसीन नक्वी यांनी बाजू मांडताना सांगितले की, "मी तेथे एका कार्टूनसारखा उभा होतो. भारतीय संघ माझ्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही, अशी कोणतीही लेखी सूचना एसीसीला देण्यात आली नव्हती." तथापि, भारतीय प्रतिनिधींनी कठोर भूमिका घेतल्यावर नक्वी यांनी सांगितले की, या विषयावर इतर व्यासपीठावर चर्चा होईल, या बैठकीत नाही.
बीसीसीआयची मागणी
बीसीसीआयने या बैठकीत स्पष्ट मागणी केली आहे की, एशिया कपची ट्रॉफी त्वरित भारतीय संघाला सोपवण्यात यावी. ट्रॉफी न मिळाल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचा आनंद ट्रॉफीसह साजरा करता आला नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.