दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी मोठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत 'एक्स' अकाउंटवरून याबद्दल माहिती दिली.
२१ कोटी रुपयांचे बक्षीस
बीसीसीआयने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "३ फटके, ० प्रत्युत्तर. आशिया कप चॅम्पियन्स. संदेश पोहोचला आहे. टीम आणि सपोर्ट स्टाफसाठी २१ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर." या ट्विटमध्ये #AsiaCup2025 आणि #INDvPAK या हॅशटॅग्सचाही वापर करण्यात आला आहे. हे ट्विट पाकिस्तानच्या संघाला आणि अलीकडच्या राजकीय तणावाला दिलेला एक स्पष्ट संदेश मानला जात आहे.
भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. त्यांनी साखळी सामने आणि सुपर फोरमध्येही पाकिस्तानचा पराभव केला होता. अंतिम सामन्यात कुलदीप यादवच्या चार विकेट्स आणि तिलक वर्माच्या नाबाद ६९ धावांच्या खेळीमुळे भारताने पाकिस्तानने दिलेले १४७ धावांचे आव्हान २ चेंडू बाकी असताना ५ विकेट्सने पूर्ण केले. भारताने ९व्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे.
या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने आपली संपूर्ण मॅच फी भारतीय सेनेला दान करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने जाहीर केलेल्या या मोठ्या बक्षीस रकमेमुळे भारतीय क्रिकेटपटूंना आणखी प्रोत्साहन मिळणार आहे.