मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवा कोलमडली
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज मुंबईसाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून, याचा परिणाम लोकल आणि रस्ते वाहतुकीवर स्पष्टपणे दिसून येत आहे.
पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आता पावसाचा जोर अधिकच वाढलेला दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रात्रभरात ६९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासून गोरेगाव, मालाड, अंधेरी, सांताक्रूझ, कांदिवली, दादर यांसारख्या भागांत जोरदार पाऊस पडत आहे.
वाहतुकीचा फज्जा आणि पूरस्थितीची भीती
मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे, तर रस्त्यावरील वाहतुकीचाही फज्जा उडाला आहे. काही सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. आज रविवार असल्याने रस्त्यावर तुलनेने कमी वाहने असली तरी, अशीच संततधार कायम राहिल्यास अंधेरी सबवेसह मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मेगाब्लॉकमुळे लोकल सेवा विस्कळीत
एकिकडे पावसाची संततधार सुरू असताना, दुसरीकडे मध्य रेल्वेने मुंबई विभागात आज मेगाब्लॉक घेतला आहे, ज्यामुळे लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. मध्य रेल्वेवर दुपारी ११ वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर असणार आहे.
ट्रान्सहार्बर आणि पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमूळे आधीच लोकल उशिराने धावत आहेत आणि त्यातच मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे लोकल प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
मुंबईसह सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट
हवामान विभागाने केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे, नाशिक आणि पुणे यांसह एकूण सहा जिल्ह्यांना आज 'रेड अलर्ट' जारी केला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.
सततच्या आणि जोरदार पावसामुळे मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांत निर्माण झालेली ही परिस्थिती गंभीर आहे. एकाच वेळी लोकलवरील मेगाब्लॉक आणि अतिवृष्टीचा इशारा यामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि सोयी-सुविधा यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सज्ज आहे.