मुंबई : मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने पुन्हा धुमाकू निर्देशळ घातला आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून, अनेक शेतशिवार आणि गावे जलमय झाली आहेत. गोदावरीसह कयाधू, मांजरा या नद्यांना मोठा पूर आला असून, घरांमध्ये व सार्वजनिक इमारतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. या पावसाळ्यात मराठवाड्यात तब्बल २८५७ गावे बाधित झाली असून, जूनपासून आजवर ९० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची मदत घ्यावी लागली आहे. परंडा तालुक्यातील पूरस्थितीने पुन्हा कहर केला, तर नांदेड आणि बीड शहरात पाणी शिरल्याने शाळा, अगदी पोलीस ठाण्यांपर्यंत पाणी पोहोचले. यामुळे लातूर व नांदेड जिल्ह्यांतील शाळा व शिकवणी वर्गांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
या गंभीर घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून मदतकार्याची माहिती घेतली. मदत शिबिरांमध्ये नागरिकांसाठी भोजन, पाणी व आरोग्याच्या सोयी व्यवस्थित उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आदेश दिले. काही जिल्ह्यांत चाऱ्याची टंचाई असल्याने तातडीने पुरवठा करण्यासही सांगितले. पावसामुळे धरणांमधून विसर्ग वाढत असल्याने नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे आणि सर्व अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर राहून कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलसंपदा विभागाकडून धरणांची परिस्थिती व विसर्गाचे तपशील जाणून घेतले. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात १५० मिलिमीटर पावसामुळे तब्बल १,२५,००० क्युसेक पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले असून, हा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत वाढू शकतो. माजलगाव धरणातून ४१,७०१ क्युसेक विसर्ग सुरू आहे, जो यापूर्वी ९५,००० क्युसेक होता. धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर आणि बीड भागातील मुसळधार पावसामुळे सीना कोळेगाव येथून ७५,००० क्युसेक पाणी सोडले जात आहे, तर उजनी धरणातून १ लाख क्युसेक विसर्ग सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातून सरकलेले कमी दाबाचे क्षेत्र सौराष्ट्राकडे जात असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येतो आहे. यामुळे रविवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. रायगड आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील वाढती पूरस्थिती पाहता प्रशासन हायअलर्टवर असून, नागरिकांनीही सतर्क राहून सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.