तुम्हाला कळतं का ? मागचा अजित पवार आणि आताचा अजित पवार फार फरक झालाय - पुण्यात अजितदादांची जोरदार फटकेबाजी
पुणे : तुम्हाला कळतं का? आधीचा अजित पवार आणि आताच्या अजित पवारमध्ये खूप फरक आहे. जसजसं वय वाढतं तसतसं आपल्याला बदलावं लागतं, आता माझ्यामध्ये मॅच्युरिटी आली आहे. त्यामुळे माझ्याकडे येताना अजिबात संकोच करू नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. ते म्हणाले की, पूर्वी आपण काही चुकीचं केलं तरी त्यावर पांघरूण घालण्यासाठी साहेब (शरद पवार) असायचे. आता मात्र आपल्यालाच पांघरूण घालावं लागतं, असं म्हणत त्यांनी मिश्किलपणे आपल्या राजकीय प्रवासातील बदल सांगितले.
पुणे जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. यात भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, भूविकास बँकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर, आणि रोहन सुरवसे यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी आपल्या भाषणात राजकीय टोलेबाजी करत विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवारांशी असलेल्या त्यांच्या नातेसंबंधांवरही भाष्य केलं, तर शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांना लक्ष्य करत त्यांच्यावर थेट निशाणा साधला.
अजित पवार म्हणाले, "दिल्लीत जाऊन मला कुणाला काही विचारून करावं लागत नाही. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचे सर्व निर्णय दिल्लीवर अवलंबून असतात. पण आम्ही मुंबईत आणि पुण्यात राहूनच निर्णय घेतो. त्यामुळे चुलता-पुतण्या, मागची पिढी, आताची पिढी किंवा पुढची पिढी यांची नावे घेऊन काही उपयोग नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
शिरुर तालुक्यात माजी आमदार अशोक पवारांवर नाव न घेता त्यांनी थेट निशाणा साधला. “शिरुरमध्ये माझीच भावकी माझ्यापासून दुरावली. तो बिचारा तर पुण्याच्या पालकमंत्रिपदाची स्वप्न बघत होता. त्याला असं वाटलं की सगळेच अजितदादांसोबत गेलेत, आता आपण साहेबांबरोबर राहिलो तर आपलं सरकार येणार आणि आपणच पुण्याचा पालकमंत्री होणार. परंतु मीच त्याला सांगून पाडलं."
या संपूर्ण वक्तव्यांवरून अजित पवारांच्या राजकीय भूमिकेत आलेला बदल स्पष्ट दिसून येतो. एकेकाळी शरद पवारांच्या सावलीत वावरणाऱ्या अजित पवारांनी आता स्वतःच निर्णय घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यांचे हे वक्तव्य केवळ अशोक पवारांवरचा वैयक्तिक हल्ला नसून, राजकीय पटलावर आपली स्वतंत्र ओळख आणि सामर्थ्य सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. यापुढे त्यांची वाटचाल त्यांच्याच नेतृत्वाखाली होणार असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.
अजित पवारांचा हा भाषणाचा स्फोट केवळ विरोधकांनाच नाही तर आपल्या घरच्यांनाही उद्देशून होता, हे स्पष्ट जाणवत होते. पुण्यातील राजकीय समीकरणे आता वेगाने बदलत असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अजितदादांची रणनीती किती परिणामकारक ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.