सौंदर्य तुझं : प्राची शिरकर
नवरात्र म्हटलं की, सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतात ते रंगीबेरंगी घागरे, गरबा-दांडियाचा जल्लोष आणि त्याला साजेशी फॅशनची झगमग. या पारंपरिक सणाला आजच्या तरुणाईने फॅशनची नवी ओळख दिली आहे आणि त्यात कपड्यांइतकाच चर्चेत असतो तो म्हणजे ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीचा ट्रेंड. चांदीसारखी चमक असलेले हे दागिने पारंपरिक लुकला आधुनिकतेची जोड देतात. विशेष म्हणजे नवरात्रातील प्रत्येक दिवसाच्या वेगवेगळ्या रंगाच्या घागऱ्यांवर ही ज्वेलरी अप्रतिम शोभून दिसते. घागऱ्यावर लांब चेन असलेले ऑक्सिडाईज नेकलेस, नव-नवीन चोकर, झुमके, नथ, जाड कड्या किंवा अंगठ्या परिधान केल्यास संपूर्ण लूकमध्ये उठाव येतो. ही ज्वेलरी केवळ हलकीच नसून दांडिया-गरब्यासाठी आरामदायी देखील ठरते. त्यातच जर तुम्ही स्मोकी आय मेकअप केला तर चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लॅमर येतो आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्वात नवरात्राचा उत्साह खुलून दिसतो. अशा प्रकारे ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी आणि स्मोकी मेकअप यांचा संगम घागऱ्याच्या पारंपरिक पोशाखाला आधुनिक फॅशनची झलक देऊन व्यक्तिमत्त्व अधिकच आकर्षक करतो. आम्ही आज तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत घागऱ्यावर ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीच्या नवनवीन ट्रेंडबद्दल तर काही तुम्हाला कामी येणाऱ्या टिप्सबद्धल...

घागऱ्यानुसार ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी कॉम्बिनेशन

लाल किंवा हिरवा घागरा : लाल किंवा हिरव्या रंगाच्या घागऱ्यासोबत जाडसर ऑक्सिडाईज्ड नेकपीस घातल्यास लुकमध्ये बोल्डनेस येतो. त्यासोबत मोठे झुमके जोडल्यास चेहऱ्यावर आणि गळ्यात दोन्ही ठिकाणी आकर्षक फोकस तयार होतो. हे कॉम्बिनेशन पारंपरिक आणि ग्लॅमरस दोन्ही वाटते.
पिवळा किंवा गुलाबी घागरा : पिवळा किंवा गुलाबी घागरा निवडल्यास हलके पण स्टायलिश ऑक्सिडाईज्ड चोकर उत्तम दिसेल. या चोकरसोबत रंगीत बीडवर्क असलेले कडे जोडल्यास हातांवरही उठाव येईल आणि संपूर्ण पोशाख फेस्टिव्हल लूकमध्ये बदलतो.
ब्लॅक घागरा : ब्लॅक रंगाच्या घागऱ्यासोबत लेयर्ड ऑक्सिडाईज्ड नेकलेस वापरल्यास लूकमध्ये डिमेन्शन तयार होते. मोठा मांगटिक्का परिधान केल्यास पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक ग्लॅमर दोन्ही लुकमध्ये मिळून अत्यंत आकर्षक परिणाम साधतो.
निळा घागरा : निळ्या घागऱ्यासोबत ऑक्सिडाईज्ड लॉन्ग चेन घातल्यास लूक स्टायलिश दिसतो. त्यासोबत झुंबर किंवा मोठे झुमके जोडल्यास चेहऱ्यावर उठाव येतो आणि दांडियाच्या ठेक्यावर पोशाख अधिक लक्षवेधी ठरतो.
ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी कशी कॅरी करावी ?
१. हेअरस्टाईल साधी ठेवा : ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी विशेषतः मोठे झुमके किंवा मांगटिक्का घातल्यास हेअरस्टाईल सोपी ठेवणे गरजेचे आहे. बन, लो किंवा वेव्ही ओपन हेअर यामुळे दागिन्यांची झळाळी अधिक उठून दिसते आणि चेहरा खुलून दिसतो.
२. स्मोकी आइज : तुम्ही जर काळ्या रंगाचा घागरा परिधान करणार असाल तर स्मोकी आइज नक्कीच ट्राय करा. चेहऱ्यावर एक वेगळाच लुक येईल.
३. लिपस्टिक हलक्या शेडमध्ये ठेवा : ज्वेलरी अधिक उठून दिसावी म्हणून लिपस्टिक हलक्या, नैसर्गिक किंवा न्यूट्रल शेडमध्ये ठेवावी. जितका साधा लूक कराल तितकाच तुमचा लूक सोबर दिसेल.

ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी कशी निवडावी?
चोकर : जर तुम्ही डीप नेक डिझाईनचा घागरा निवडला असेल तर ऑक्सिडाईज्ड चोकर हा सर्वोत्तम पर्याय आहे. गळ्याशी घट्ट बसणारा हा दागिना लूकला आकर्षक बनवतो आणि चेहऱ्याला उठाव आणतो. डान्स करतानाही तो सहज मॅनेजेबल असल्यामुळे स्टायलिशसोबत आरामदायी ठरतो. तुमच्या लूकला एक वेगळीच जादू येईल.

झुमके किंवा झुंबर : मोठे झुमके किंवा झुंबर हे ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीमधील सर्वात लोकप्रिय पर्याय आहेत. घागऱ्याच्या रंगीबेरंगी लूकसोबत हे झुमके जबरदस्त शोभतात आणि चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आणतात. गरब्याच्या प्रकाशात हे झुंबर चमकून पूर्ण लूकला आकर्षक बनवतात.

हातातील कडे/बांगड्या : दांडियाच्या तालावर हातांची हालचाल ही लूकला एक वेगळीच शोभा आणते. हातातील ऑक्सिडाईज्ड कडे किंवा बांगड्या नृत्याच्या प्रत्येक स्टेपमध्ये झळकत राहतात. त्यामुळे पोशाख अधिकच लक्षवेधी दिसतो आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्वात ऊर्जा निर्माण होते.

मांगटिक्का किंवा माथ्याचा पट्टा : पारंपरिकतेची झलक- घागऱ्यासोबत माथ्यावर घातलेला ऑक्सिडाईज्ड मांगटिक्का किंवा माथ्याचा पट्टा संपूर्ण लूकला पारंपरिक टच देतो. खासकरून दांडियाच्या पोशाखात हा दागिना राजेशाही भाव निर्माण करतो आणि चेहऱ्याला उठाव आणतो.
नाकात नथ : ऑक्सिडाईज्ड नथ हा छोटा पण चेहऱ्यावरचा प्रभावी दागिना आहे. नवरात्राच्या उत्सवी वातावरणात ही नथ परिधान केल्यास चेहऱ्याला एथनिक टच मिळतो आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्व पारंपरिकतेसोबत ग्लॅमरस वाटतं.