नवी दिल्ली : अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय... विमानाच्या इतिहासात पहिल्यांदाच ही घटना घडली आहे. एक १३ वर्षांचा मुलगा विमानाच्या चाकाजवळ जिथे लँडिंग गिअर असतो त्या ठिकाणी जाऊन लपला आणि विमानात शिरला. याच ठिकाणी लपून राहून मुलाने विमान प्रवास केला. चकीत करणारी बाब म्हणजे लँडिंग गिअरजवळ लपून मुलाने ९४ मिनिटे विमान प्रवास केला. या प्रवासात प्रदीर्घ काळ विमान ३० हजार फुटांच्या उंचीवर उडत होते. या कालावधीत वेगाने वारे वाहत असताना मुलगा लँडिंग गिअरला धरुन लपून राहिला. दिल्ली विमानतळावर उतरेपर्यंतचा मुलाचा पूर्ण प्रवास आव्हानात्मक होता. पण आश्चर्यकारकरित्या त्याने हा प्रवास पूर्ण केला. दिल्लीत विमान उतरल्यावर मुलगा गुपचूप विमानातील प्रवाशांच्या गर्दी मिसळला. पण त्याच्याकडे तिकीट नव्हते. प्रवासी उतरत होते त्यावेळी कोणालातरी संशय आल्यामुळे मुलाला अडवून त्याची चौकशी करण्यात आहे. चौकशीत सर्व प्रकार समजला. सगळा प्रकार कळताच ऐकणाऱ्यांना धक्का बसला.
काम एअर (Kam Air) ही अफगाणिस्तानातील सर्वात मोठी खाजगी विमान कंपनी आहे. या कंपनीचे विमान (RQ-4401) २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११:१० वाजता दिल्ली विमानतळावर उतरले त्यावेळी मुलगा विमानातून बाहेर आला. अफगाणिस्तानहून आलेल्या या मुलाला त्याच दुपारी KAM एअरलाइन्सच्या परतीच्या विमानातून (RQ-4402) काबूलला परत पाठवण्यात आले. मुलाने दिलेल्या माहितीनुसार, तो काबूल विमानतळावर प्रवाशांच्या मागे गाडी चालवत धावपट्टीवर पोहोचला. त्यानंतर तो सर्वांच्या नजरा चुकवत नंतर तो सर्वांच्या नजरेतून सुटून विमानात चढला आणि उड्डाण घेण्याच्या अगदी आधी चाकाजवळ लपून बसला. या पद्धतीने प्रवास करणे प्राणघातक ठरू शकते. नियमानुसार या प्रवासाला परवानगी नाही. पण १३ वर्षांच्या मुलाने हा प्रवास सुरक्षितरित्या केला. हा चमत्कार कसा झाला हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार जेव्हा विमान उड्डाण करते तेव्हा चाकांजवळील ऑक्सिजनची पातळी झपाट्याने कमी होते आणि तापमान गोठणबिंदूपेक्षा खूपच खाली जाऊ शकते. या परिस्थितीत चाकांजवळ कोणी अडकले असेल अथवा लपले असेल तर संबंधित व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे. उड्डाणानंतर विमानाची चाकं आतमध्ये जातात आणि जागा पूर्ण सील होते. जर चाकाजवळ लपलेली व्यक्ती त्यावेळी आतल्या छोट्या जागेत लपून राहिली तरच काही काळ सुरक्षित राहू शकते. पण विमान उंचावर गेल्यानंतर कोणालाही श्वास घेणे कठीण होते. यामुळे मुलगा ३० हजार फुटांच्या उंचावर चाकांजवळ लपूनही जीवंत कसा ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.