मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर असलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते झालं. शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा एकदा क्रीडापटूंसाठी सुरू झाला. मागील दीड वर्षापासून शिवाजी पार्क जिमखान्याचे नूतनीकरण सुरू होते. घटस्थापनेच्या दिवशी सकाळीच सचिनच्या हस्ते जिमखान्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले. याप्रसंगी मनसे प्रमुख राज ठाकरे, मंत्री आशिष शेलार जिमखान्याचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.
'मुलींसाठी ही व्यवस्था सर्व जिमखान्यांवर हवीच'
शिवाजी पार्क जिमखाना नूतनीकरणाच्या कामात राज ठाकरे यांचे उल्लेखनीय योगदान आहे. जिमखान्याचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनीही विचारपूर्वक काम केले. खेळाडूंसाठी उत्तम सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या. जिमखान्यात मुलांप्रमाणेच मुलींसाठीही कपडे बदलण्यासाठी चांगली व्यवस्था आहे. ही व्यवस्था कौतुकास्पद आहे. आता क्रीडा क्षेत्रात मुलांप्रमाणेच मुलीही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यामुळे देशातील सर्व जिमखान्यांमध्ये मुलांप्रमाणेच मुलींसाठीही कपडे बदलण्यासाठी चांगली व्यवस्था असणे आवश्यक आहे, असे सचिन म्हणाला. त्याने जिमखान्याच्या नव्या इमारतीच्या कामाचे तसेच यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या सर्वांचेच अभिनंदन केले.