मुंबई: भाजप आणि त्यांची युवा शाखा, भाजयुमो, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून पुढील १५ दिवस "सेवा पंधरवडा" उपक्रम देशभर राबवताना दिसून येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, आज अनेक राज्यात "नमो युवा रन" आयोजित करण्यात आली. मुंबईत देखील याचे दिमाखात आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रनला हिरवा झेंडा दाखवत आपला उत्स्फूर्त सहभाग देखील दर्शवला.
मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोड प्रोमेनेड येथे 'नमो युवा रन' चे आज सकाळी आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण, ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांसोबतच, भाजप खासदार आणि भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याकरणामुळे मुंबईकरांनी मोठ्या संख्येत या रनमध्ये सहभाग घेतला होता.
भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) द्वारे आयोजित "नमो युवा रन" रविवारी केवळ मुंबईत नव्हे तर जयपूर, कुरुक्षेत्र, रायपूर आणि आगरतळा येथे देखील पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या रनला विविध राज्यांतील मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांनी हिरवा झेंडा दाखवत दिमाखात सुरुवात केली.
"फिट इंडिया" मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी "नमो युवा रन" चे आयोजन
भारतीय जनता युवा मोर्चा (भाजप) म्हणते की "नमो युवा रन" चा उद्देश तरुणांमध्ये फिटनेस, एकता आणि देशभक्ती वाढवणे आहे. देशाच्या विकासाला आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील "फिट इंडिया" मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.