मुंबई : मुंबई व ठाणेकरांसाठी वाहतुकीच्या समस्येचे समाधान म्हणून महत्त्वाकांक्षी ठरणारा मेट्रो मार्ग ४ व ४ए (हिरवी मार्गिका) प्रकल्पाला गती मिळाली आहे. वडाळा–घाटकोपर–मुलुंड–कासारवडवली–गायमुख या मार्गावर उभारण्यात येणारा हा प्रकल्प केवळ प्रवाससुविधा निर्माण करणार नाही, तर शहराच्या आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय विकासालाही चालना देईल. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
मंत्री सरनाईक म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ठाण्याच्या जनतेचे मेट्रो मधून प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे. याबरोबरच गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे भविष्यात घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.
वैशिष्ट्ये..
मार्गाची एकूण लांबी ३५.२० कि.मी. असून यात मेट्रो मार्गिका ४ – ३२.३२ कि.मी. व ४ए – २.८८ कि.मी. आहे.
गाड्या ८ डब्यांच्या असतील व प्रतितास प्रतिदिशा प्रवासी संख्या (PHPDT) ३३,४१७ एवढी असेल.
ठाणेकरांसाठी फायदेशीर पाऊल
मेट्रो मार्ग ४ पूर्ण झाल्यानंतर पूर्व व पश्चिम उपनगरांमधील दुवा अधिक मजबूत होणार आहे. यामुळे व्यवसाय केंद्रे, औद्योगिक पट्टे आणि शैक्षणिक संस्थांना थेट फायदा मिळणार आहे.
हा मार्ग दक्षिणेला मेट्रो मार्ग ११ (वडाळा–सीएसटीएम) व उत्तरेला मेट्रो मार्ग ४ए (कासारवडवली–गायमुख) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग १० (गायमुख–मीरा रोड) यांच्याशी जोडला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई–ठाणेकरांसाठी अखंड प्रवासाची सोय होणार आहे.
या विस्तारानंतर एकूण लांबी ५८ कि.मी. होणार असून हा भारतातील सर्वात मोठा मेट्रो मार्ग ठरेल. दररोज तब्बल २१.६२ लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे.
प्रवास वेळेत ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत बचत होणार असून नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे.
ठाणे सारख्या महानगराला आधुनिक वाहतुकीची कास धरावी लागणार हे वास्तव आता टाळता येणार नाही. मेट्रो मार्ग ४ व ४ए या दृष्टीने नवा टप्पा ठरेल. आज वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि तासन्तास वाया जाणारा वेळ हे सर्व प्रश्न जटिल झाले आहेत. अशा वेळी पर्यावरणपूरक, सुरक्षित व जलदगती मेट्रो हा प्रवासाचा नवा पर्याय ठरेल.