महिला, मुलींना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेची नियमावली सरकारने आधीच जाहीर केली आहे. पण नियमांना डावलून स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करुन काही महिलांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची सखोल छाननी सुरू केली आहे. गैरफायदा घेणाऱ्या तसेच नियमात न बसणाऱ्या जिल्ह्यातील महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे.
काही कुटुंबांतील तीन-चार महिलांनी तर काहींनी वय बसत नसतानाही अर्ज केल्याचे उघडकीस आल्याने फेरपडताळणी करण्यात आली. योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यात ५ लाख ९२ हजार २३१ महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ हजार ७७२ प्रस्ताव अपात्र ठरले. लातूर जिल्ह्यात पाच लाख ६७ हजार ४५९ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या संशयित लाभार्थींच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यात १६१६ महिला अपात्र ठरल्या आहेत.तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याच्या संशयावरून ५५ हजार ०९२ महिलांच्या कागदपत्रांची तपासणी झाली. त्यात ३ हजार २११ महिला अपात्र ठरल्या आहेत.