५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...!
महाभारत या महाकाव्याच्या संदर्भाने सांगायचे तर, दक्षिणायन व उत्तरायण यात असलेले ५८ दिवसांचे अंतर आणि या ५८ दिवसांमधले पितामह भीष्म यांचे स्मरणकोष म्हणजेच ‘महाभारत’…! या महाभारताची मोहिनी नाट्यक्षेत्रातल्या मंडळींना पडली नसती तर ते नवल ठरले असते. ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते व कादंबरीकार अशोक समेळ यांनाही महाभारताने आकर्षित केले आणि यातून जन्माला आली, ‘ते आभाळ भीष्माचं होतं’ ही महाकादंबरी...! मुळात ज्यांच्यामुळे महाभारत घडले; ते महाभारताचे महानायक म्हणजे भीष्माचार्य! भीष्म नसते तर महाभारत घडले नसते. या महाकाव्यात नाट्य पदोपदी ठासून भरलेले आहे. यातली एक घटना अशी की रणांगणावर अर्जुनाच्या बाणाने भीष्म पडतात; पण रथातून खाली पडताना त्यांचे लक्ष आभाळाकडे जाते. तेव्हा त्यांना अभिजीत नक्षत्र घसरताना दिसते. त्यावेळी त्यांच्या मनात येते की, “मी इच्छामरणी भीष्म असे दक्षिणायन लागले असताना मृत्यूला सामोरा का जाऊ? निदान चांगल्या मुहूर्तावर तरी मी मृत्यू पत्करीन. उत्तरायण लागेल तेव्हा मी मृत्यूचा
स्वीकार करीन”.
आता नाटककार व दिग्दर्शक अशोक समेळ यांना यात भरून व भारून राहिलेले नाट्य जाणवले आणि त्यांच्या लेखणीतून शब्द उमटले, ‘ते आभाळ भीष्माचं होतं’. पण मुळात याचा प्रारंभ वेगळ्याच घटनेने झाला होता. अश्वत्थाम्यावरचे लेखन पूर्ण करणारे अशोक समेळ हे एकदा विचारमग्न स्थितीत असताना त्यांना त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकू आला, “महाभारताचा शेवट तुझ्या हातून लिहून झाला आहे; पण तू महाभारताची सुरुवात कुठे लिहिली आहेस? ती तुला लिहायलाच लागेल”. हा संवाद घडल्यावर त्यांनी भीष्माचार्यांवर लेखन सुरू करायचे ठरवले आणि त्याचा प्रारंभ करताना त्यांनी थेट महाभारताचे युद्धच डोळ्यांसमोर ठेवले.महाभारताचे युद्ध सुरू होऊन नऊ दिवस झाले आहेत. भीष्माचार्यांच्या पराक्रमाने पांडव हताश झाले आहेत. पांडवांना काही सुचत नसल्याने ते सगळे श्रीकृष्णाकडे जातात आणि त्याला म्हणतात, “भीष्म पितामह इच्छामरणी आहेत. त्यांना मृत्यू येत नाही, तोपर्यंत आमचा विजय होऊ शकत नाही”. पांडवांच्या या वक्तव्यावर श्रीकृष्ण त्यांना सांगतो, “भीष्म तुमच्याशी शत्रू म्हणूनच लढत आहेत; त्यामुळे यावरचा उपाय आपण भीष्मांनाच भेटून विचारू”. हे ठरल्यावर पांडव भीष्मांना त्यांच्या शिबिरात जाऊन भेटतात. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, “शिखंडीला माझ्यासमोर उभा करून अर्जुनाने बाण चालवावा”, असा उपाय भीष्म पांडवांना सुचवतात. दुसऱ्या दिवशी युद्धभूमीवर शिखंडीला भीष्मांच्या समोर उभा करून अर्जुन बाण चालवतो आणि रथात हात जोडून बसलेले भीष्म पडतात. इथूनच सुरू होतात, भीष्माचार्यांचे ५८ दिवसांचे स्मरणकोष...!
पण या स्मरणकोषांत रमताना, केवळ एवढ्यावरच अशोक समेळ थांबले नाहीत; तर लेखक म्हणून त्यांनी अधिक स्वातंत्र्य घेतले. भीष्म शरपंजरी पहुडले आहेत आणि ५८ वा दिवस उजाडला आहे. आता उत्तरायण लागले आहे आणि भीष्मांचा आत्मा त्यांचे शरीर सोडून निघून गेलेला आहे. आता सर्वकाही संपले असतानाच श्रीकृष्णाला मात्र काहीतरी जाणवते आणि तो गंगेच्या किनारी येतो. आभाळाकडे पाहिल्यावर त्याला गंगापुत्र भीष्मांच्या डोळ्यांत साठलेले पाण्याचे थेंब दिसतात आणि त्याचवेळी गंगा सुद्धा त्याला गोठून गेलेली दिसते. इथे लेखकाच्या मनात भन्नाट नाट्य प्रसवते. श्रीकृष्ण गंगेला स्पर्श करतो आणि तिला म्हणतो, “आता जाऊ दे त्याला. अजून किती वर्षे त्याला ताटकळत ठेवणार आहेस...?” इतक्यात भीष्मांच्या पाणावलेल्या डोळ्यांतून दोन अश्रू गंगेच्या पात्रात पडतात आणि गंगा हळूहळू प्रवाही होऊ लागते...! हाच तो ५८ दिवसांच्या स्मरणकोषांच्या नाट्याचा आणि रंगमंचीय आविष्काराचा
अंतिम चरण...!