श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा

श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा


अर्चना सरोदे


देरवाने मानवाला इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे; परंतु त्याचा आनंद मात्र जसा घ्यायला हवा तसा घेता येत नाही. भुतकाळात राहून गेलेल्या गोष्टींची खंत आणि भविष्याची चिंता यात मनुष्याचा वर्तमान हरवत चालला आहे. खरे तर प्रत्येक व्यक्तीची शांततापूर्वक जीवन जगण्याची इच्छा असते. पण जिथे जीवन आहे तिथे जगण्यासाठीचा संघर्ष देखील आहे. मग तो व्यक्तिगत जीवनात असो किंवा कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्यात असो तो आपण टाळू शकत नाही. आपण कितीही आदर्शवादी असलो तरी हा संघर्ष मात्र अटळ असून नाती, शेजार, व्यवसाय-धंद्यातील सहकारी व प्रतिस्पर्धी या सर्वच संबंधात कुठे ना कुठे तरी सुरू असतो. अशा परिस्थितीत शांततामय जीवन कसे जगावे हेच कळेनासे होते. हल्ली सामान्य माणसाचे जगणे असुरक्षित झाले आहे. सकाळी बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरूप घरी परत येईल की नाही याची शाश्वती नाही. कधी कुठे काय होईल सांगता येणार नाही आणि ते आपल्याला टाळताही येत नाही. सभोवतालची परिस्थिती फारच विचित्र झालेली आहे आणि यामुळेच माणूस निराश, हतबल झालाय. आणि म्हणून आपल्या जीवनातील अडचणी व संकटे ही दुसऱ्या कुणीतरी सोडवावी अशी त्याची मानसिकता तयार झालेली आहे. ह्या त्याच्या मानसिकतेमुळे त्याला कुणातरी बाबा, महाराज, या लोकांचा आसरा घ्यावासा वाटतो आणि मग काय याच्या मानसिकतेचा फायदा घेण्यासाठी भोंदू बाबा, साधू, महाराज पैसा, पासरी गल्लोगल्ली पसरलेले आहेतच. सद्यस्थितीत हा एक व्यवसायच झाला आहे आणि सामान्य माणूस म्हणजे त्यांचं एटीएम कार्ड असे म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही.
या मंडळींची तामझाम तर बघतच बसावी. यांच्या संपत्तीचे आकडे ऐकून आपल्याला चक्कर येईल. यांचे विपणन कौशल्य ही अफाट असते ज्याच्या जोरावर ते वेगवेगळ्या अानुषंगाने जाहिरात करून प्रसिद्ध होतात व आपले अनुयायी तयार करण्यात यशस्वी होतात. अनुयायी तयार झाल्यावर ते टिकून राहावेत म्हणून ते अंधश्रद्धा देखील पसरवायला लागतात. खऱ्या-खोट्या चमत्काराच्या गोष्टी सांगून माणसाला जाळ्यात ओढतात. त्यांच्या या संमोहनाला सामान्य माणूस बळी पडतो. हे चक्र असेच चालू राहते. एक बाबा गेला की त्या जागी दुसरा उभाच असतो. मी परमेश्वराचा अवतार आहे असे सांगून सामान्य माणसाला नादी लावून त्याला परावलंबी केले जाते. परिणामी लोकांमधील आत्मविश्वास कमकुवत होतो. स्वावलंबी वृत्ती, कर्तव्य कर्म करण्याची प्रवृत्ती नाहीशी होते. आपलं चुकतंय, आपण अयोग्य मार्गावर चालत आहोत हे न पटल्यामुळे स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी हे लोक त्या भोंदू बाबांवर अवलंबून राहतात आणि त्या बाबाला डोक्यावर उचलून धरतात. हे भोंदू बाबा सामान्य जनांचा बुद्धिभेद करत राहतात आणि सामान्य जन नकळत बुद्धिभेद करून घेतात आणि अंधश्रद्धेच्या आहारी जातात. कसं आहे ना, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा फारच पातळ आणि पुसट असते. ती कधी आणि कशी ओलांडली जाते हे आपल्याला देखील कळत नाही.
म्हणून श्रद्धा ही असायलाच हवी; परंतु त्या श्रद्धेचं अंधश्रद्धेत रूपांतर होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. शेवटी काय भोवतालचे वातावरण किंवा सभोवतालची परिस्थिती जरी आपण बदलू शकत नसलो तरी वास्तवाचा स्वीकार करून आपली दृष्टी आपण बदलू शकतो. आपण सृष्टी बदलू शकत नाही पण दृष्टी बदलणे आपल्या हातात आहे, ही सकारात्मक नवी दृष्टी आपल्या मनाची दशा बदलते आणि मनाची दशा बदलली की दिशा आपोआप बदलते. किंबहुना मनाची दशा बदलली की दिशा बदलण्याची गरजच उरत नाही. आपल्या मनात जे युद्ध सुरू असते ते थांबवणे अधिक गरजेचे आहे. मनामुळेच सुख-दुःख ह्या भावना निर्माण होतात. म्हणून प्रथमतः तेच ताब्यात घ्यायला हवे. समर्थ रामदास स्वामींनी त्याकरिता मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. मनुष्य हा रज, तम, सत्त्व या त्रिगुणांत बांधलेला असून मन हे रजोगुणी आहे. ते सदैव विषय चिंतनात गढलेले असते. दैनंदिन जीवनांत मनाचे स्थान फार मोठे आहे. मनाचे सर्व कार्य रजोगुणांच्या भरवंशावर चालते म्हणून मुळातच हा रजोगुण जर कमी केला तर मन सत्त्वगुणी होईल आणि त्यामुळे मनाचे विषय-चिंतन संपेल. परिणामतः मनाचा बुद्धीला विषय पुरविणे बंद होईल, अशी स्थीर बुद्धीच अध्यात्माला उपयोगी असते. बुद्धी स्थिर झाली की पुढचे सर्व सोपे होते. समर्थांनी सुद्धा ।बुद्धी दे रघुनायका ।। अशी कळवळीची विनंती रामरायाला केलेली आहे. बुद्धी स्थिर झाली की जीवनाला उसंत मिळते. समाजात राहूनच मनुष्य आपली सर्वांगीण प्रगती करू शकतो आपला विकास करू शकतो.

Comments
Add Comment

महर्षी पराशर

महर्षी पराशर डॉ. अनुराधा कुलकर्णी ग्वेदातील ९ अग्निसूक्ते महर्षी पराशरांची आहेत. त्या सूक्तांच्या एकूण ९१ ऋचा

पिंडाला न शिवलेला कावळा

पिंडाला न शिवलेला कावळा ऋतुजा केळकर काव-काव करणारा कावळा पिंडाला शिवत नाही’ आभाळात एकटाच फिरणारा तो काळा पक्षी,

या जगण्यावर, या जन्मावर...

या जगण्यावर, या जन्मावर... प्राची परचुरे वैद्य  जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...’ हे गीत जगण्यावर प्रेम

संपादित ज्ञान स्फूर्ती ज्ञान प्रतिभा ज्ञान

संपादित ज्ञान स्फूर्ती ज्ञान प्रतिभा ज्ञान सद्गुरु वामन पै- मनुष्यप्राणी हा व्यवहारातून ज्ञान मिळवतो.

Tips: पूजेच्या वेळी या नियमांचे पालन केल्यास नशीब बदलेल आणि मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद

मुंबई: हिंदू धर्मात पूजा-पाठ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.