आयसीसीच्या टी २० क्रिकेटच्या ताज्या रेटिंगनुसार भारतीय संघ क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. भारताकडे २७१ रेटिंग आहेत. फलंदाजांच्या ताज्या रेटिंगनुसार भारताचा अभिषेक शर्मा ८८४ रेटिंगसह अव्वल स्थानी आहे. गोलंदाजांच्या ताज्या रेटिंगनुसार भारताचा वरुण चक्रवर्ती ७३३ रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. वरुणने एकदम तीन स्थानांची झेप घेतली आहे.
एशिया कप 2025 मधील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने १३ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार मारत ३१ धावा केल्या होत्या तर वरुण चक्रवर्तीने चार षटकांत २४ धावा देत फहीम अश्रफला पायचीत (LBW) केले होते. फहीम १४ चेंडूत ११ धावा करुन परतला होता. याआधी वरुणने यूएई विरुद्धच्या सामन्यात दोन षटकांत चार धावा देत मोहम्मद झोहेबला बाद केले होते. मोहम्मद झोहेब पाच चेंडूत दोन धावा केल्यानंतर वरुणच्या गोलंदाजीवर कुलदीप यादवकडे झेल देऊन परतला होता. वरुणने लागोपाठच्या दोन सामन्यात चमकदार कामगिरी केली. याचा त्याला आयसीसी रेटिंगमध्ये फायदा झाला.
वरुण चक्रवर्ती फेब्रुवारी २०२५ मध्ये दुसऱ्या स्थानावर होता. मार्च २०२५ पासून न्यूझीलंडचा जेकब डफी टी २० क्रिकेटमध्ये गोलंदाजंच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आणि वरुण च्कवर्ती दुसऱ्या स्थानी अशी स्थिती झाली. अखेर आशिया कपमध्ये कामगिरीत सातत्य राखल्यामुळे वरुणच्या टी २० क्रिकेटच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे.