बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी दिवसेंदिवस गाजत चालली आहे. या प्रकरणात कलाकेंद्रात नृत्य करणारी पूजा गायकवाड सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असून पोलिस तिची सखोल चौकशी करत आहेत. तपासादरम्यान तिचे आणि दिवंगत गोविंद बर्गे यांचे कॉल रेकॉर्ड तसेच मोबाईल चॅट्सही पोलिसांच्या हाती लागले आहेत. या डिजिटल पुराव्यांच्या तपासणीतून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोविंद बर्गे हे कलाकेंद्रात गेले असता त्यांची पूजा गायकवाडशी प्रथम भेट झाली. या भेटीपासून सुरू झालेली ओळख काही दिवसांतच अधिक गहिरी झाली. सुरुवातीला डान्सर आणि ग्राहक एवढ्यावरच मर्यादित असलेले नाते हळूहळू वैयक्तिक पातळीवर गेले. गोविंद बर्गे पूजाच्या प्रेमात आकंठ बुडाले आणि पूजानेही त्यांच्याशी प्रेमसंबंध ठेवले, हे स्वतः पूजाने याआधीच कबूल केले होते. मात्र आता सुरू असलेल्या चौकशीतून त्यांच्या नात्याबाबत अजूनही नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत.
कधी फ्लॅट, तर कधी लॉजवर भेटायचे आणि…
गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील संबंध केवळ कलाकेंद्रापुरते मर्यादित राहिले नाहीत. सुरुवातीला कॉलवर नियमित संवाद, त्यानंतर व्हॉट्सॲपवर झालेली चॅटिंग आणि नंतर एकमेकांना भेटण्यासाठी खास जागांची निवड अशा पद्धतीने त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. चौकशीत उघड झाले की, दोघांची भेट फक्त कलाकेंद्रातच होत नसे, तर ते एकमेकांच्या घरी, काही ठिकाणी खासगी फ्लॅटवरदेखील भेटत असत. याशिवाय, कधीकधी त्यांनी बीड शहरातच नव्हे तर वैराग परिसरातील विविध लॉजमध्येही एकत्र वेळ घालवला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत या सर्व गोष्टींची कबुली पूजाने स्वतः दिल्याचे समोर आले आहे.
मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली असून, ...
गोविंदला शेवटाकडे नेणारी पूजाची खेळी
मृत गोविंद बर्गे पूर्णपणे पूजा गायकवाडच्या प्रेमात गुंतला होता. वर्षभराच्या नात्यात त्याने तिला पैशाची मदत तर केलीच, शिवाय अडका, दागिने, महागडे मोबाईल तसेच घर खरेदीसाठीही मोठी आर्थिक साथ दिली. मात्र, काही दिवसांपूर्वी पूजाने आणखी मोठ्या मागण्या पुढे केल्या. गेवराईतील आलिशान बंगल्यासाठी पैसे द्यावेत, तसेच गोविंदच्या नावे असलेली जमीन तिच्या भावाच्या नावे करावी, असा तगादा तिने लावला. गोविंदने या मागण्या मान्य करण्यास नकार दिला तेव्हा पूजाने त्याच्याशी संपर्क तोडला आणि ब्लॅकमेल करण्याचा मार्ग अवलंबला. धमक्या देत नातं मोडल्यामुळे गोविंद मानसिक तणावात गेला. निराश मनःस्थितीत तो सासरच्या गावात पूजाला भेटायला गेला, मात्र तिथेही ती भेटायला तयार झाली नाही. अखेर हताश झालेल्या गोविंदने कारमध्ये बसून स्वतःवर गोळी झाडत आयुष्य संपवले.
गोविंद बर्गेच्या मृत्यूबाबत पोलिसांची प्राथमिक नोंद आत्महत्येची असली, तरी त्याचे कुटुंबीय आणि मित्रांनी मात्र हा दावा धुडकावून लावला आहे. “गोविंदकडे तर साधी काठीही नव्हती, मग पिस्तुल त्याच्या हातात कुठून आलं?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या मृत्यूमागे घातपाताचा मोठा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी तपासाची गती वाढवत पूजा गायकवाडची कसून चौकशी सुरू ठेवली आहे. तिच्याशिवाय तिच्या सहकाऱ्यांचे तसेच जवळच्या मैत्रिणींचेही जबाब नोंदवले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणात अजून अनेक धक्कादायक माहिती बाहेर पडण्याची शक्यता आहे.