छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आयुष्य आपलं संपवलं आहे. आईने केवळ अभ्यास करायला सांगितले म्हणून मुलीने थेट टोकाची भूमिका घेतली असल्याचं म्हंटल जात आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली.
विशाखा अनिल वक्ते असे मृत तरूणीचे नाव आहे. ती छत्रपती संभाजीनगरमधील वडगाव कोल्हाटी भागात राहत होती. विशाखा नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तर, तिचे वडील एका कंपनीत काम करतात. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास विशाखा टिव्ही पाहत होती. त्यावेळेस विशाखाची आई किचनमधून बाहेर आली. नंतर विशाखाला अभ्यास करण्यास सांगितले. नंतर विशाखाची आई किचनमध्ये गेली. त्यावेळी विशाखाचा लहान भाऊ दुसऱ्या खोलीत अभ्यास करत होता. विशाखाला आईच्या बोलण्याचा राग आला. राग मनात धरून विशाखा तिसऱ्या मजल्यावर गेली. आणि घरातील तिसऱ्या मजल्यावरील पायऱ्यांवर तिनं गळफास लावून आत्महत्या केली.
विशाखाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून आईला धक्काच बसला. तिनं तातडीने शेजाऱ्यांना बोलावून घेतलं. तसेच विशाखाला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून विशाखाला मृत घोषित केले. सदर घटनेची पोलिस तपासणी करत असून, विशाखाने आत्महत्या करण्याचे नेमके हेच कारण आहे का? किंवा इतर काही गोष्टी त्यास कारणीभूत आहे? याविषयी पोलिस तपास करत आहेत.