विधानभवनातील कर्मचाऱ्यांकडून विनापडताळणी ‘पास’ वितरण; गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना थेट लॉबीत प्रवेश

विशेष समितीच्या अहवालातील गंभीर निरीक्षण; आव्हाड-पडळकर समर्थकांच्या राड्याप्रकरणी अहवाल सादर


नागपूर : मुंबईतील विधानभवन परिसरात पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी शुक्रवारी विशेषाधिकार समितीचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. समितीचे अध्यक्ष आ. नरेंद्र भोंडेकर यांनी हा अहवाल सभागृहात वाचून दाखवला. या अहवालात विधानभवनाच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आली असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनाही विधानभवनातील कर्मचाऱ्यांकडून अगदी सहजतेने आणि विनापडताळणी प्रवेशपत्रिका (पास) देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

घटना काय घडली होती?


दि. १७ जुलै २०२५ रोजी पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना विधानभवनाच्या लॉबीत जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख आणि आ. गोपीचंद पडळकर यांचे समर्थक सर्जेराव टकले यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. काही क्षणातच त्याचे रुपांतर धक्काबुक्कीत आणि नंतर हाणामारीत झाले. या घटनेमुळे विधिमंडळ परिसरात मोठी खळबळ उडाली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेत, विशेषाधिकार समितीकडे चौकशीसाठी पाठवले होते.

समितीच्या चौकशीत काय आले समोर?


विशेषाधिकार समितीने या प्रकरणी एकूण १० बैठका घेतल्या. नितीन देशमुख, सर्जेराव टकले यांच्यासह इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सीसीटीव्ही फुटेज, प्रवेशपत्रिका वितरण रजिस्टर आदी पुराव्यांची पडताळणी केली. चौकशीअंती समितीला आढळले की, विधानभवनात येणाऱ्या अभ्यागतांची कोणतीही पार्श्वभूमी तपासली जात नाही. त्यामुळेच गंभीर गुन्हे दाखल असलेले व्यक्तीही विधानभवनाच्या लॉबीपर्यंत मजल मारू शकले.

समितीच्या प्रमुख शिफारशी


१. विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश देण्याकरिता स्वतंत्र नियमावली तयार करावी. ही नियमावली सुरक्षा तज्ज्ञ आणि सल्लागारांच्या मार्गदर्शनाने बनवावी आणि त्याचे काटेकोर पालन करावे.
२. प्रवेशिका वितरण प्रणाली ही महाराष्ट्र पोलीस डेटाबेसशी थेट जोडावी, जेणेकरून अभ्यागतांची रिअल-टाईम गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणी होईल. गुन्हेगारी रेकॉर्ड आढळल्यास त्यांचा प्रवेश आपोआप नाकारला जाईल.
३. सुरक्षा सल्लागार आणि पोलीस दलाशी सतत समन्वय ठेवून विधानभवनाची सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम करावी.
४. पास वितरण प्रणाली तंत्रज्ञानतज्ज्ञांच्या सल्ल्याने आधुनिक आणि सुरक्षित बनवावी.

दोषींवर कठोर कारवाईची शिफारस


समितीने नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना विधानभवनाच्या विशेषाधिकाराचा भंग केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. त्यांना प्रत्येकी दोन दिवसांची दिवाणी कारावासाची शिक्षा आणि मुंबई तसेच नागपूर येथील विधानभवन परिसरात ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत प्रवेशबंदी करण्याची शिफारस केली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि